श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना.. या महिन्यात अनेक धार्मिक सण येतात. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व अधिक आहे. या महिन्यात भगवान शिवांची मनोभावे पूजा केली जाते. चार्तुमासात पृथ्वीचा कारभार महादेवांकडे असतो. त्यामुळे महादेवांच्या पूजेचं विधान सांगितलं गेलं आहे. भगवान शिवांना रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. रुद्राभिषेक विधीनुसार केला तर कुंडलीतील दोष सौम्य होतात. तसेच भक्तांच्या इच्छाही पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, रुद्राभिषेकामुळे सर्व दु:खातून दिलासा मिळतो अशी भावना आहे. शास्त्रात वर्णन केलेल्या रुतम्-दु:खम्, द्रावयति-नाशयतीतिरुद्र: या श्लोकाचा अर्थच महादेव सर्व दु:खाचा नाश करतात असं आहे. कुंडलीतील दोष रुद्राभिषेक केल्याने दूर होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिना 25 जुलैपासून सुरु होत आहे. तसेच 21 ऑगस्ट रोजी या महिन्यातील शिवरात्री आहे. या शिवरात्रीला श्रावणी शिवरात्री म्हणतात
रुद्राभिषेक कसा करावा? जाणून घ्या पद्धत
रुद्राभिषेक सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम भगवान गणेशाचा अभिषेक करा. फुले, नैवेद्य, दुर्वा इत्यादी अर्पण करा. इतर देवतांचं आवाहन करून नवग्रह पूजा करा. त्यानंतर भगवान शिवाचं ध्यान करा. बेलपत्र घ्या आणि त्यावर ओम लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. अभिषेक करण्यासाठी, गंगाजल, दूध, उसाचा रस इत्यादी पाण्यात एकत्र मिसळा. रुद्री पाठ करा. त्यानंतर शृंगीमध्ये पाणी घाला आणि हळूहळू शिवलिंगावर अभिषेक करा. रुद्रस्त्राध्यायीचा जप करा. जर तुम्हाला रुद्रास्राध्यायी येत नसेल तर ओम नमः शिवायचा जप करा.
रुद्राभिषेकाचे फायदे काय आहेत?
महादेवांचा रुद्र अभिषेक करण्याचे अनेक फायदे धर्मशाश्त्रात सांगितले आहेत. भगवान शिवाचा रुद्र अभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, तसेच धनप्राप्ती होते. वाईट नजर आणि तंत्रापासून संरक्षण होते. नकारात्मकता दूर होते. शिव रुद्राभिषेक केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात.