सेवानिवृत्तधारकांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतो. सेवानिवृत्तीधारकांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करता येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS-95) किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरून 2,500 रुपयांपर्यंत करण्याची शक्यता आहे. याविषयीची मागणी अनेक दिवसांपासून रेटण्यात येत होती. याविषयीच्या प्रस्तावावर 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
11 वर्षात पहिल्यांदा पेन्शन वाढ?
सध्या दरमहा 1000 रुपयांची पेन्शन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येते. ही पेन्शन 2014 साली निश्चित करण्यात आली होती. तेव्हापासून त्यात कोणताही बदल झाला नाही. पण महागाई, राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे निवृत्ती रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. आता 1000 रुपये जगण्यासाठी अत्यंत तोकडी रक्कम असल्याने पेन्शन वाढवण्याची मागणी होत होती. बोर्डाच्या शिफारशीनंतर सरकारच्या मंजुरी गरज लागेल. त्यानंतर पेन्शन वाढेल.
कोणाला मिळते पेन्शन?
कमीत कमी 10 वर्षे सतत सेवा पूर्ण करणाऱ्या आणि 58 वर्षे वयाच्या व्यक्तीला पेन्शनचा लाभ देण्यात येतो. EPS अंतर्गत नियमित पेन्शनसाठी अशी व्यक्ती पात्र ठरते. ज्या सदस्यांनी लवकर नोकरी सोडली ते जमा झालेली पेन्शन काढू शकतात अथवा कमी पेन्शनचा पर्याय त्यांना निवडता येतो.
पीएफ रक्कम काढा काही मिनिटात
EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी PF काढण्याचे नियम सोपे केले आहेत. तुमचा UAN सक्रिय असेल आणि KYC पूर्ण झाले असेल, तर कर्मचाऱ्याला घरबसल्या ऑनलाईन पीएफ काढता येईल. त्यासाठी ईपीएफओच्या अधिकृत साईटवर जा. ऑनलाईन सेवेतंर्गत क्लेम सेक्शनमध्ये जाऊन बँकेच्या तपशीलांची पडताळणी करा. त्यानंतर पीएफ काढण्याची विनंती करा. ओटीपी पडताळणीनंतर पुढील 7-8 दिवसात निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
आता ही प्रक्रिया काही दिवसात इतिहासजमा होणार आहे. कारण या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात कर्मचाऱ्याला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एटीएम कार्ड अथवा युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याची पीएफ रक्कम काढता येणार आहे. अवघ्या काही मिनिटात त्याला पीएफची रक्कम काढता येईल.




