हुंदका दाटला, डोळे डबडबले : वस्त्रनगरीतील पूरग्रस्त हळू हळू घरी परतू लागले

ताजी बातमी / ऑनलाइन टीम

गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी झालेल्या पावसाने वस्त्रनगरी व परिसरातील अनेकांचे संसार पाण्यात गेले आहेत. आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणामी आता परिसरातील महापूर हळू हळू ओसरत आहे. आणि हे पाणी ओसरत असताना अनेक पूरग्रस्त आपल्या घरी परतत आहेत.

हुंदका दाटलेला आणि डोळे पाण्याने डबडबले अशी काहीशी अवस्था या परिसरातील नागरिकांची दिसून येत आहे.शहरातील चांदणी चौक परिसर, परीट गल्ली, गर्जना गल्ली, दुर्गामाता गल्ली आदींसह काही ठिकाणच्या घरांतील पाणी उतरल्याने साफसफाईचे काम सुरू होते.डबडबलेल्या डोळ्यांनी घरातील चिखल हटवत पुन्हा एकदा साहित्य सावरण्याचे काम या नागरिकांकडून करण्यात येत होते.

काही सलून तसेच किराणा दुकानासह व्यावसायिकांनाही नुकसान पाहून अश्रू अनावर झाले होते. अद्यापही काही भागातील पाणी कायम असल्याने ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.महापुराचा फटका तब्बल 20 हजारांहून अधिक नागरिकांना बसला आहे. गावभाग व जुना चंदूर रोड परिसर पाण्याखाली गेला आहे.

अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी नागरी वस्तीमध्ये असले तरी काही भागात संथ गतीने पाणी पाठीमागे जात असल्यामुळे काही गल्ल्या, घरे यांच्यातील पाणी ओसरले आहे. मंगळवारीही पावसाची उघडीप असल्यामुळे आणि घरातील पाणी ओसरल्यामुळे नागरिकांची सफाईसाठी लगबग सुरू होती. मात्र आता पाण्यातील बुडालेला संसार उभारताना येथील नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. दरम्यान अद्याप बरीच कुटुंबे स्थलांतरित आहेत. आणि अजूनही बऱ्याच भागांमध्ये पाणी उतरलेले नाही.

Leave a Reply

Join our WhatsApp group