नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी मोस्ट वॉन्टेड दोघांना अटक


पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणाने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानुसार या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी कर्नाटकमधील म्हैसूर येथून अटक केली आहे. या खून प्रकरणातील सरजी टोळीशी संबंधित असलेल्या सुनील वाघ व सचिन देवमारे या संशयित आरोपीना म्हैसूर येथून पंढरपूर येथे आणण्यात आले आहे.


माजी नगराध्यक्षा सुरेखा दिलीप पवार यांचा मुलगा नगरसेवक संदीप पवार हे 18 मार्च 2018 रोजी येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते.


हॉटेलमध्ये ते बसलेले असताना अचानक अज्ञात लोकांनी कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून केला होता.


या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीने हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
खून प्रकरणातील एकूण २७ आरोपींपैकी २४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.


या खून प्रकरणातील उर्वरित 3 पैकी सुनील वाघ, सचिन देवमारे आणि अन्य एक असे तीन संशयित आरोपी फरार होते.


यापैकी मोस्ट वॉन्टेड सुनील वाघ आणि सचिन देवमारे हे कोल्हापूर, बेळगाव येथे काही दिवस राहिले. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून राहात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.


सोलापूर पोलिसांच्या प्रयत्नाला यश
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शोध घेतला जात होता.
पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.


मगदूम यांच्या पथकातील शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत सुनील वाघ आणि सचिन देवमारे या मोस्ट वॉन्टेड दोघा आरोपींना म्हैसूर येथे अटक करून पंढरपूरला आणले आहे.


आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी अटक करावयाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Join our WhatsApp group