औषध मारताना शॉक लागून मजुराचा मृत्यू

पट्टण कोडोली (ता.हातकणंगले) येथे उसाच्या शेतामध्ये तणनाशक मारत असताना पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. आण्णासो दादू रांगोळे (वय ५२ वर्षे) असे त्यांचे नाव असून या घटनेमध्ये मौला नबी महात (वय ४७ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली आहे.

पट्टण कोडोली येथील आरजी मळा येथील शकिल ईलाई मुल्लाणी यांच्या गट नंबर ९८७ मधील ऊसाच्या शेतामध्ये औषध फवारणीचे काम सुरु होते. या शेतामध्ये विजेची तार तुटून पडली होती.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यातील आण्णासो रांगोळे यांचा या तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला.

यादरम्यान रांगोळे जागीच मृत्यूमुखी पडले. तर मौला महात यांनाही विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले.

यावेळी बाकीच्या तिघांनी हा प्रकार पाहून महावितरण कंपनीला कळविले व वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

यावेळी डॉक्टरांनी आण्णासो रांगोळे हे मयत झाल्याचे घोषीत केले तर मौला महात यांना कोल्हापूर येथील पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

हुपरी पोलिसात या घटनेची वर्दी संजय बाळसो रांगोळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group