पुण्यातील प्रशिक्षणाहून परतलेले १२ पोलिस कोरोनाबाधित


पुणे येथील प्रशिक्षणाहून परतलेल्या शहर पोलिस दलातील १२ पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित (Corona) झाल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर करण्यात आली असून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप शिंदे यांनी दिली. या १२ पैकी १० जणांनी दोन्ही डोस घेतले होते. तर एकाचे अॅलर्जीमुळे लसीकरण झालेले नव्हते.


शहर पोलिस दलातील विविध पोलिस ठाण्यातील गुप्तचर शाखेतील सुमारे ३३ कर्मचाऱ्यांचे पुणे येथे ३० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत डीएसबीचे प्रशिक्षण होते. हे प्रशिक्षण पूर्ण करून सर्व कर्मचारी ९ सप्टेंबरला परत आले व १० सप्टेंबरला गणेशोत्सव असल्याने त्यातील काही आपापल्या गावी गेले.


यातील राहिलेल्यांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता १२ जण पॉझिटिव्ह (Corona) निघाले. त्यांना आमदार निवासात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित १३ जणांची चाचणी रविवारी करण्यात आली.


या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले त्यांचे मित्र, नातेवाईक, आप्त तसेच सहकारी पोलिस कर्मचारी अशा सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट रविवार आणि सोमवार असे दोन दिवस करण्यात येईल.


त्यात कोरोनाबाधित आढळणाऱ्या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Join our WhatsApp group