इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत(IPPB) बचत खातं उघडलं असेल आणि तुमच्या ओळखपत्रांआधारे खाते अद्ययावत केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयपीपीबीने डिजिटल बचत खाते बंद झाल्यास दंडाची रक्कम जमा करावी लागतील. हा दंड जीएसटीसह 150 रुपये असा असेल. हा नवा नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. ‘आयपीपीबी’च्या मते, केवायसी (KYC) अपडेट न केल्यामुळे वर्षभरानंतर डिजिटल बचत खाते बंद झाले तरच दंडाचा दणका बसेल. मात्र खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अल्पावधीतच जनसामान्यांच्या मनात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. पण खाते बंद झाल्यास ग्राहकाला दंडाचा भूर्दंड सोसावा लागेल.
बचतीवरील व्याज घटले
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 1 फेब्रुवारी 2022 पासून बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत. आयपीपीबीने बचत खात्यांवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बचत खात्यातील एक लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर सध्याचा व्याजदर वार्षिक 2.50 टक्के आहे. मात्र आता तो 2.25 टक्क्यांवर आला आहे.
5 मार्चपासून नवे नियम लागू होणार
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्यासाठी शुल्क लागू केले आहे. हा दंड जीएसटीसह 150 रुपये असेल. हा नवा नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे.. केवायसी अद्ययावत न केल्यामुळे डिजिटल सेव्हिंग्ज बँक (DGSB) खाते एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर बंद झाले तरच हे शुल्क लागू होईल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संकेतस्थळानुसार, कोणत्याही अडथळ्याशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी, कृपया कोणत्याही आयपीपीबी अॅक्सेस पॉईंटला भेट देऊन 1 वर्षाच्या आत आपले डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे.
या गोष्टींची काळजी घ्या
खातेदाराला 12 महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपडेट केले जाईल.
या खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करता येतात.
खाते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण न झाल्यास, खाते बंद होईल.
12 महिन्यांत केवायसी पूर्ण केल्यानंतर डिजिटल बचत खाते पोस्ट ऑफिस बचत खात्याशी (POSA) संलग्न करता येईल.