Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाUnder 19 World Cup : पंचतारांकित विश्‍वविजय

Under 19 World Cup : पंचतारांकित विश्‍वविजय

ताजी बातमी ऑनलाइन टीम

भारताच्या 19 वर्षांखालील युवा क्रिकेट संघाने गेल्या शनिवारी अंतिम फेरीत इंग्लंडला नमवून पाचव्यांदा युवा विश्‍वचषक (Under 19 World Cup) जिंकला. युवा विश्‍वचषक हा 1988 ला चालू झाला. पण, पहिल्याच विश्‍वचषकानंतर पुढची 10 वर्षे स्पर्धा झालीच नाही. 1998 पासून मात्र दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते आहे. ही निव्वळ युवकांची स्पर्धा नसते तर प्रत्येक देशासाठी भावी क्रिकेटपटू हेरण्याची संधी यामुळे मिळते. आता तर आयपीएलसाठी खेळाडू शोधायलाही या स्पर्धेकडे सर्वांचे बारकाईने लक्ष असते. मोहम्मद कैफ, युवराजसिंग पासून पार्थिव पटेल, विराट कोहली ते गेल्या युवा विश्‍वचषकात चमकलेले पृथ्वी शॉपर्यंत अनेक क्रिकेटपटू आपल्याला या युवा विश्‍वचषक स्पर्धेने दिले आहेत.

भारताने जरी पाच वेळा हे अजिंक्यपद पटकावले असले तरी यंदाचा विजय हा वेगळा होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा होत होती. कोरोनाची तिसरी लाट डोके वर काढत असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नव्हते. सराव कुठे होईल, किती वेळ मिळेल ते स्पर्धा निर्धोकपणे पार पडेल का, या सर्वच बाबींवर एक टांगती तलवार होती. भारताने द. आफ्रिकेला नमवून स्पर्धेची सुरुवात तर झकास केली, पण पुढच्या आयर्लंडच्या सामन्याच्या आधी संघात कोरोनाने शिरकाव केला. कर्णधार, उपकर्णधारासह पाच खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. वेस्ट इंडिजला बदली खेळाडू पाठवणेही एक कठीण काम होते.

एक तर तिथे जायला थेट विमान नाही तेव्हा युरोपातल्या मर्यादित विमानसेवा आणि कोरोना नियम सांभाळत यावर सर्व प्रवास अवलंबून होता. पण, अशावेळी संघाची आपत्कालीन योजना कार्यान्वित होते. यामध्ये पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. आयर्लंडच्या सामन्याआधी आणीबाणीसद‍ृश परिस्थिती होती. संघाचा मॅनेजर कोरोनामुळे दुसर्‍या ठिकाणी स्थानबद्ध होता. तो फोनवरूनच सर्व सूचना देत होता. संघाचा फिजिओथेरपिस्ट हा संघाचा डॉक्टर बनला तर संघाचा व्हिडीओ अ‍ॅनॅलिस्ट हा मॅनेजर बनला.

संघात दहा खेळाडू फिट होते आणि संघ बनवायला जायबंदी असलेला अकरावा खेळाडू घ्यावा लागला. सामन्याच्या अर्धा तास आधी अष्टपैलू निशांत सिंधूवर कर्णधारपदाची धुरा सोपवली तेव्हा त्याचा प्रथम यावर विश्‍वासच बसला नाही. अशा ऐनवेळी बांधलेल्या संघाने आयर्लंडला 174 धावांनी तर पुढच्या सामन्यात युगांडाला तब्बल 326 धावांनी धूळ चारली आणि आपला विजयाचा वारू पुढे दौडत ठेवला तो अंतिम विजयापर्यंत.

या सर्व घडामोडीतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे बीसीसीआयच्या विविध योजनांचे हे फलित आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही तंत्र, तंदुरुस्ती आणि सराव या प्रमुख त्रिसूत्रींवर भर देते. इथे खेळाडू घडवले जात नाहीत, पण प्रस्थापित किंवा होतकरू खेळाडूंना सर्वांगीण सहाय्यता मिळते. या राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण स्पर्धेच्या सुरुवातीपासून संघाबरोबर होते. जोडीला रणजी क्रिकेट गाजवलेले हृषीकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले सारखे मार्गदर्शक होते. हे युवा खेळाडू मैदानावर पूर्णपणे व्यावसायिकता दाखवत होते. त्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास त्यांच्यात दिसत होता. बीसीसीआयच्या योजना या एका प्रक्रियेत बनवल्या जातात तेव्हा प्रशिक्षक किंवा इतर संबंधित व्यक्‍ती बदलल्या तरी खेळाडूंच्या संस्कारांवर फारसा फरक पडत नाही.

बीसीसीआयच्या पाठबळाबरोबरच दुसरे महत्त्वाचे म्हणजे आज कुठच्या भागातून हे खेळाडू येतात यावरही त्यांच्या यशाची भूक ठरते. एकेकाळी भारतीय संघात मुंबईचे सात-आठ खेळाडू असायचे, पण आता तसे दिसत नाही. संजय मांजरेकरने याच्यामागचे संभाव्य कारण एकदा सांगितले होते. जेव्हा भारतीय संघात मुंबईच्या खेळाडूंचे प्राबल्य होते तेव्हा ते बहुतांशी मुंबईच्या मध्यमवर्गातल्या घरातले खेळाडू होते. मुंबईत जगण्यासाठी धडपड, जीवघेणा लोकलचा प्रवास करून मैदान गाठणे या राहणीमानातून आपोआप त्यांच्यात यशस्वी होण्यासाठीची जिद्द असायची. कुठचीही गोष्ट कष्टाशिवाय न मिळण्याचे ते दिवस होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -