ई-श्रम पोर्टलवर कामगार नोंदणीचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरुवात झालेल्या या सरकारी पोर्टलने कामगारांचा विश्वास जिंकला आहे. कामगारांच्या नोंदणीची संख्या सहा महिन्यांतच 25 कोटींवर पोहोचली आहे.केंद्र सरकारचे कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली. असंघटीत क्षेत्रातील 38 कोटी कामगारांची माहिती ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये ई-श्रम पोर्टल सुरू केले होते.या पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरेलू कामगार यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून मंत्रालयाने आठवडाभरापासून कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, “ई-श्रम पोर्टलने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे ब्रीदवाक्य पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 25 कोटी नोंदणीपर्यंत पोहोचणे सामूहिक इच्छाशक्ती दर्शवते,” असे त्यांनी सांगितले.
ई-श्रम पोर्टल उमंग मोबाइल अ ॅप्लिकेशनवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवा आणि राष्ट्रीय वाहक सेवा (एनसीएस) पोर्टलमध्ये थेट सेवा प्रदान करते. पंतप्रधान श्रम योगी मॅन-धन पेन्शन योजनेंतर्गत ‘डोनेट-ए-पेन्शन’ उपक्रमाची घोषणाही यादव यांनी केली.
डिसेंबर 2021 मध्ये ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा 500 रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असा निर्णय सरकारने घेतला होता. याअंतर्गत सरकारने ई-श्रम शिधापत्रिकाधारकांना 1 हजार रुपयांची आर्थिक मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणारे मजूर जसे स्थलांतरित मजूर, शेतमजूर, घरकामगार, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगार इत्यादींना योजनेतंर्गत लाभ मिळतो.
विम्याचे संरक्षण
देशात पहिल्यांदाच ई-श्रम पोर्टलमार्फत 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणीचा ध्यास घेण्यात आला. त्यासाठी एक प्रणाली आखण्यात आली. या पोर्टलवर कामगारांच्या नोंदणी सोबतच केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ ही देण्यात येणार आहे. eSHRAM पोर्टलवर प्रत्येक नोंदणीकृत सदस्याला 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मिळतील.