रिंकू देसाईच्या समर्थकाच्या शिंगणापूर येथील घरावर रविवारी मध्यरात्री दगडफेक करून घराच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दारात पार्किंग केलेली मोटार पेटवून देण्यात आली. रिंकू देसाईच्या घरावरील हल्ल्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
एकापाठोपाठ एक अशा दोन ठिकाणी घरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनी परिसरात घबराटीचे वातावरण आहे. सामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. रिंकू देसाईच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी रविवारी एका अल्पवयीन संशयितासह तिघांना ताब्यात घेतले होते. संशयितांवर करवीर पोलिसांनी जुजबी कारवाई केल्याची देसाई कुटुंबीयांची तक्रार आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी समर्थकाच्या घरावर दगडफेक करून तीन अनोळखी तरुणांनी मोटार पेटवून दिली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते.