वारणानगर येथील वारणा शिक्षण मंडळ संचलित वसतिगृहात विद्यार्थ्याने खोलीतील खाटाला मोबाईल चार्जरची वायर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. शुभम कृष्णात बजागे (वय 19, रा.पडवळवाडी, ता. करवीर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. शुभमने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे कोडोली पोलिसांनी सांगितले.
शुभम इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात शिक्षण घेत वसतिगृहात राहात होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे वर्गात गेला. दुपारनंतर मात्र तो खोलीत राहिला. त्याच्या खोलीतील विद्यार्थी आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी शुभमला हाक दिली. मोबाईलवर संपर्क साधला. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून दरवाजाची आतील कडी काढली तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. याची माहिती व्यवस्थापनास दिल्यानंतर त्यांनी कोडोली पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.