ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : येथील यादवनगरमध्ये टोळक्याने तलवारीने वाहनांची तोडफोड करत दहशत माजविली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. यामध्ये चार टेम्पो, दोन रिक्षा, दोन मोटारींसह दुचाकींचेही नुकसान झाले आहे. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयितांची धरपकड सुरु आहे.
मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (वय ३५, रा. यादवनगर), शाहरुख मुराद मोमीन (२८, रा. सुभाषनगर) अशी संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, या दोघांसह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मोहसीन मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित मुजम्मील कुरणे याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. सोमवारी मध्यरात्री तो आपल्या काही साथीदारांसोबत यादवनगर परिसरात आला. त्याच्या हातात तलवार होती. दारुच्या नशेत या टोळक्याने एमएसईबी बोर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना लक्ष्यकेले.
परिसरातील टेम्पो, मोटारी, रिक्षांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. या आवाजाने काही स्थानिक लोक गोळा झाले. पण संशयितांच्या हातातील हत्यारे पाहून त्यांना विरोध करण्याचे कोणाचेही धाडस झाले नाही. यावेळी १२ ते १३ वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंगळवारी सकाळपासून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता. राजारामपुरी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.