जिल्ह्यात शहराबरोबर ग्रामीण भागात महिलांची गृह व कुटीर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. प्रामुख्याने गृहोद्योग मोठ्या प्रमाणात असताना यात सांडगे, पापड, विविध खाद्यवस्तू यासह इतर साहित्याला मागणी असते. सध्या सर्वत्र प्लास्टिकबंदी राबविली जात आहे. तसेच दुकानेत छापे टाकून कारवाई केली जात आहे. मग कुठेले प्लास्टिक वापरायचे आणि कुठले नाही. हे मात्र गृह उद्योग महिलांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे माल पॅकिंगअभावी पडून आहे.
चंदगड तालुक्यात सांडगे, पापड, शेवया, लहान मुलांच्या खाण्याचे सांडगे, विविध मसाले, मिरची पावडर, अशा वस्तूंना हवा किंवा पाणी लागून चालत नाही. त्यामुळे या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत ठेवाव्या लागतात. हे शासनालाही माहीत आहे. मग दुधाच्या पिशव्यांना सवलत देता आणि गृहोद्योगाला नाही. त्यामुळे या महिलांतून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय शासनाच्या आदेशनुसार ज्या प्लास्टिक पिशव्यांची गरज आहे. अशा पिशव्या बाजारात उपलब्ध नाहीत आणि आहे त्या पिशव्या उपलब्ध करून काम करीत असताना थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे गृहोद्योग अडचणीत आहे. कोणत्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.