राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. जून महिना संपत आला, तरी राज्यात दमदार पाऊस झालेला नाही. जमिनीत पेरणीयोग्य ओल नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत राज्यात 10 टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. (Drought forecast)
राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, अनेक शहरांचा पाणीपुरवठाही अडचणीत आला आहे. पुढील महिनाभर पुरेल एवढाच, पाणीसाठा धरणात आहे. पुढील महिनाभरात पाऊस न झाल्यास राज्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावं लागू शकतं..
प्रशांत महासागराच्या विषुवृत्तावर सरासरी तापमानात ऑगस्ट-2020 पासून घट झाल्याचे पाहायला मिळते. सरासरी तापमान उणे 0.5 अंश सेल्सिअसच्या खाली राहत असल्यास, या स्थितीला ‘ला निना’ परिस्थिती असं म्हणतात. असे झाल्यास भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडत असल्याचा गेल्या दोन वर्षांचा अनुभव आहे.
भारतीय हिंद महासागरातील विषुवृत्तावरील पूर्व व पश्चिम भागातील तापमानाची नोंद घेतली जाते. या निरीक्षणाला ‘इंडियन ओशन डायपोल इंडेक्स’ (हिंदी महासागर द्वि-ध्रुव) म्हटले जाते. 21 जून 2022 च्या नोंदीनुसार ‘हिंदी महासागर द्वि-ध्रुव’ तटस्थ आहे. हा निर्देशांक गेल्या काही महिन्यांपासून शून्याच्या खाली आहे.
मध्य-उत्तर महाराष्ट्राला फटका..
भारतात ‘ला नीना’ परिस्थिती पावसाळ्यासाठी पोषक असली, तरी ‘आयओडी’ (द्वि-ध्रुव स्थिती) ही उणे आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी किंवा अत्यल्प पडण्याची शक्यता जास्त आहे. मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे.
खरीप हंगामातील पेरण्यासाठी 30 जूनपर्यंतचा कालावधी योग्य मानला जातो. त्यामुळे अजूनही चांगला पाऊस झाल्यास, पेरण्या होतील. त्यामुळे लगेच पेरण्या लांबल्या, असे म्हणता येणार नाही.. परंतु पाऊस लांबला, तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलंय…