Tuesday, February 27, 2024
Homeतंत्रज्ञाननव्या 'डिजिटल रुपी'ला चांगला प्रतिसाद; कोट्यवधींचा व्यवहार

नव्या ‘डिजिटल रुपी’ला चांगला प्रतिसाद; कोट्यवधींचा व्यवहार

देशात ऑनलाइन पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन पेमेंट करत असताना कॅशही जवळ ठेवावीच लागते. परंतु, आता खिशात कॅश ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण आता भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वांसाठी डिजिटल रुपयांच्या चाचणीसाठी पायलट प्रोजेक्टची मोठी घोषणा केली असून, देशात १ डिसेंबरला रिटेल डिजिटल रुपयाचे यशस्वीरित्या लॉन्चिंग करण्यात आले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पहिल्याच दिवशी १.७१ कोटी रुपयांचा डिजिटल रुपीच्या माध्यमातून व्यवहार केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल रुपात विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.

या डिजिटल रुपीची मागणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या फक्त चार बँकांनी निवडक शहरांसाठी केली होती. येत्या काळात बँकांकडून वाढत्या मागणीचा विचार करता रिझर्व्ह बँक आणखी डीजिटल रुपी जारी करणार आहे. पहिल्या टप्प्यात डिजिटल रुपये दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले गेले. या शहरांमध्ये चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल करन्सी उपलब्ध करुन दिली जात आहे. तसेच, पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून डिजिटल रुपी उपलब्ध करुन दिली जात आहे.

यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनाही पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदौर, कोच्ची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांचाही समावेश केला जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणारा E-Rupee एक डिजिटल टोकनसारखे काम करेल.
सीबीडीसी आरबीआयच्यावतीनं जारी करण्यात येणाऱ्या करन्सी नोटचं हे डिजिटल स्वरुप आहे.
डिजिटल रुपीची देवाण-घेवाण पर्सन-टू-पर्सन (P2P) आणि पर्सन-टू-मर्चंट (P2M) अशा दोन्ही माध्यमातून करता येते.
जर मर्चंटला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडील QR कोड स्कॅन करुन पेमेंट करू शकता.
डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण बँकांच्या ई-वॉलेटच्या माध्यमातून केली जाते.

काय आहे ई रुपया

ई रुपया डिजीटल टोकन आधारित असणार आहे.
ही करन्सी केवळ रिझर्व्ह बॅकच जाहीर करु शकते.
मूल्य बॅक नोटांप्रमाणेच समान असणार आहे.
त्याला पेपर नोटेप्रमाणेच २०००, ५००, २००, १००, ५० रुपयांसह इतर डिनॉमिनेशनमध्ये छापण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -