गोकुळमध्ये परस्पर विरोधी लढणारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आ. पी. एन. पाटील(P.N.Patil) यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने दिलजमाई झाली. पी. एन. यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषदेच्या फलाटावरून सुटलेली नेत्यांची ही समझोता एक्स्प्रेस आता जिल्हा बँक बिनविरोधच्या स्टेशनपर्यंत पाेहचणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गोकुळ निवडणुकीपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँक बिनविरोध करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर गोकुळच्या तत्कालीन सत्ताधार्यांनी दूध संघही बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील आपल्या स्तरावर गोकुळसाठी टोकाचे प्रयत्न करत असताना जिल्हा बँकेच्या आडाने रणनीती आखली जात होती. मात्र, दिलजमाईचा त्यावेळचा प्रयत्न असफल झाला. काँग्रेस अंतर्गत चढाओढीनंतर पुन्हा गोकुळच्या निमित्ताने सतेज पाटील आणि पी. एन. पाटील गट आमने-सामने आला.
जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या निमित्ताने आ. पी. एन. पाटील यांच्याशी राजकीय दुरावा कमी करीत राहुल पाटील यांना अध्यक्षपदी विराजमान करून पालकमंत्री पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांनी बेरजेचे राजकारण केले. परिणामी, यानंतर पालकमंत्री पाटील आणि पी. एन. पाटील जिल्हा परिषद जाहीर कार्यक्रमातही एकत्र येताना दिसत आहेत. नुकत्याच जिल्हा काँग्रेस कमिटीत पालकमंत्री पाटील आणि आ. पी. एन. पाटील यांनी आमदारांसह सेल्फी काढत दिलजमाई आणि एकसंध काँग्रेसचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी, शिवसेनेसह आताची एकसंध काँग्रेस जिल्हा बँकेच्या रणांगणात उतरण्याचे संकेत आहेत. जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी सर्वस्व ताकद लावताना दिसेल. भाजपला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेला राष्ट्रवादीची साथ द्यावी लागणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील आणि महादेवराव महाडिक यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणातील उपद्रवमूल्यावरच नेत्यांतील समझोता एक्स्प्रेसचे यश अवलंबून आहे.
राजकीय गुंतागुंत वाढणार
जिल्हा बँकेला आर्थिक आरिष्ठातून काढल्याने मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी बँकेची सत्ता महत्त्वाची आहे. बदलेल्या राजकीय परिस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात सन्मानाने प्रवेश करणे प्रतिष्ठेचे आहे. काँग्रेसचे नेते सहकारी संस्था आणि पक्षीय राजकारण वेगळे मानत सवतासुभा मांडत आले आहेत.
जिल्हापरिषद अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने छाती ठोकून दावा सांगणे आणि पदाचा हट्ट धरत मुद्दा ताणून धरणे, चर्चेच्या फेर्यात ऐनवेळी काँग्रेसला बिनशर्त बाय देणे, ही राजकीय खेळी असल्याचे जाणकार सांगतात. जिल्हा परिषदेच्या राजकारणात बेरजेच्या राजकारणाची गणिते खोलवर रुजली आहेत. त्यातूनच जि. प. अध्यक्षपदासाठी भाजपने पर्यायाने महाडिक गटाने माघार घेतली.
आ. पी. एन. पाटील यांची मर्जी राखण्याचा दोन्ही बाजूंनी यानिमित्ताने प्रयत्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्षपदी आ. पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील विराजमान झाल्याने गोकुळच्या जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन जिल्हा बँकेतील आघाडीचे संदर्भ बदलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महापालिका, गोकुळ आणि जिल्हा परिषद या तिन्ही संस्थांचे एकमेकांत राजकीय गुंतागुंत असल्याने पुन्हा जिल्ह्याचे राजकारण मात्र ढवळून निघणार आहे.