चार वर्षांपूर्वी जगभरात कोविडचे संकट आले. सर्व काही ठप्प झाले. याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसला. वर्ग नियमित नाहीत. परीक्षाही सोप्या पद्धतीने घेतल्याने विद्यार्थ्यांची क्षमता विकसित झाली नाही, असा विचार समाजमनात रुजला. पुढे त्यांना नोकऱ्या मिळविण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. खासगी क्षेत्रासोबतच सरकारी क्षेत्रातही कोविड १९ बॅचच्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी उत्साह दिसत नाही. पदवीधर २०१९ ते २०२१ या वर्षातील असेल तर थेट परतीचा मार्ग दाखवला जातो. या बॅचला येणारे अनुभव आजपासून… कोविड आला, शाळा-महाविद्यालयांचे फाटक बंद झाले. थोड्या कालावधीनंतर वर्गात चालणारे अध्यापन ऑनलाईन वर्गात सुरू झाले. याला जुळवून घेण्यात विद्यार्थी – शिक्षकांचा कस लागला. दोन वर्षांच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात ऑनलाईन झाल्या. यामुळे समाजात, मार्केटमध्ये कोविड बॅचची नकारात्मक चर्चा होऊ लागली.काही कंपन्यांनी तर ‘कोविड बॅच नॉट अलाऊड’ अशी जाहिरात देत नव्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. ‘डिग्री आहे; पण नोकरी नाही’ अशी अवस्था कोविड बॅचची आहे.लाखो विद्यार्थ्यांनी कोविडमध्ये विविध क्षेत्रातील पदव्या मिळवल्या. ऑनलाईन लेक्चरद्वारे अभ्यासक्रम शिकवला. त्यावेळी त्यांचे ‘प्रॅक्टिकल’ झाले नाही. यामुळे नोकऱ्यांसाठी लागणारी पात्रता विद्यार्थ्यांनी मिळवली नाही, अशी चर्चा होऊ लागली. परिणामी, या विद्यार्थांना नोकरीत घेण्यासाठी कंपन्या नकार देऊ लागल्या. याचा धडा घेत काही विद्यार्थ्यांनी कोविडनंतर विविध प्रॅक्टिकल ज्ञान देणारे अभ्यासक्रम पूर्ण केले. यामुळे त्यांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र, शैक्षणिक शुल्क व इतर खर्चातून आलेला आर्थिक ताण, कोविडमध्ये कमी झालेले आर्थिक उत्पन्न यामुळे सर्वांनाच अशा प्रकारचे शिक्षण नव्याने घेणे शक्य नव्हते. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी कोविड बॅचचा शिक्का घेऊन नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत.