12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाईल. परंतु हिंदू परंपरेनुसार, उद्यापासून म्हणजेच वसुबारसा दिवसापासून दिवाळीला सुरुवात होईल. यंदा वसुबारसा सण 9 नोव्हेंबर रोजी आला आहे.
या दिवशी गाईंचे पूजन केले जाते. तसेच तिला ओवाळून नैवेद्य दाखवला जातो. खऱ्या अर्थाने उद्यापासूनच घराच्या अंगणात पणत्या लावायला सुरुवात होते. त्यामुळे वसुबारसा सण तितकाच महत्त्वाचा असतो. आज आपण याच वसुबारसा सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वसुबारसा सणादिवशी गायीचे आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. या दिवशी गाईला स्वच्छ आंघोळ घातली जाते. तसेच तिचे पाय धुऊन घेतले जातात, तिला ओवाळले जाते, तिला गंध लावला जातो. त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. थोडक्यात वसुबारस सणादिवशी गाईविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतात गाईगुरांची संख्या देखील तितकी जास्त आहे. यात गाईच्या दुधावर शेतकऱ्यांचे उत्पन्न निघते. त्यामुळे शेतकरी हा तिचा नेहमी ऋणी असतो. हे ऋण शेतकरी वसुबारस दिवशी व्यक्त करतो. त्यामुळे वसुबारसा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो.
हिंदू धर्मामध्ये वसुबारस सणादिवशी एक प्रथा देखील पाळली जाते. ती प्रथा म्हणजे, या दिवशी नंदा नामक धेनूस उद्देशून व्रत केले जाते. वसुबारस या शब्दाचाच असा अर्थ होतो की, वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे वासरू. त्यामुळे वसुबारस सणानिमित्त गाई आणि वासराची पूजा करण्यात येते. यादिवशी अनेक स्त्रिया उपवास देखील धरतात. तसेच, घरातील गाईंना आंघोळ घालून त्यांना हळद लावतात. इतकेच नव्हे तर, त्यांच्या अंगावर नवीन वस्त्रे चढवतात. यानंतर, सायंकाळच्या वेळी परिसरात दारात पणत्या लावतात. यामुळेच वसुबारस सणापासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.