पावसाळा म्हटलं की आपल्याला मस्त कुठेतरी फिरायला जावेसे वाटते. त्यातून जास्त जोरदार पाऊस पडू लागला की मग आपल्याला कुठे बाहेर जायचाही कंटाळा येतो. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथे यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
त्यातून जूलै महिना सुरू झाला की मग समजायचे की यंदा भरपूर पाऊस पडणार आहे. जूलैच्या महिन्यात भरपूर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की देशात असं एक ठिकाण आहे जिथे सर्वाधिक मुसळधार पाऊस पडतो.
भारतातील एक अशी जागा आहे जिथे दरवर्षी जगात सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तुम्हाला कदाचित हे शहर चेरापुंजी वाटत असेल परंतु ते हे ठिकाण नाही. पूर्वी चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होते आता मेघालयातील मासिनराम हे ठिकाण देशातील सर्वाधिक मुसळधार पावसाचे ठिकाण आहे. मासिनराम येथे चेरापुंजीपेक्षा 100 मिमी जास्त पाऊस पडतो. या कारणास्तव या ठिकाणाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. जगात सर्वाधिक पाऊस पडणारी दोन्ही ठिकाणे मेघालयात आहेत हा देखील योगायोग आहे.
येथे जूलै महिन्यात भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडतो. विकिपीडियानुसार, मौसीनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात असलेले खेडेगाव आहे. शिलाँगपासून 65 किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल 11872 मिलिमीटर (467.4 इंच) पाऊस होतो.
जूलै महिन्यात पाऊस
येथे जूलैच्या महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मासिनराम आणि चेरापुंजीमध्ये फक्त 10 मैलांचे अंतर आहे. मात्र, मसिनरामने चेरापुंजीपेक्षा पाऊस जास्त पडतो. मासिनराम येथे दरवर्षी सरासरी 11871 मिमी पाऊस पडतो. येथील एकूण पावसापैकी 90 टक्के पाऊस केवळ सहा महिन्यांत पडतो. मेघालयात दिवसभर पाऊस पडत नसला तरी दररोज पाऊस पडतो.
का पडतो जास्त पाऊस?
हे गाव ईशान्य भारताच्या मेघालय राज्यातील राजधानी शिलाँगपासून 65 किमी अंतरावर पूर्व खासी टेकड्यांमध्ये आहे. नैऋत्य मान्सूनमध्ये येथील टेकड्या पावसाच्या ढगांना अडवतात ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. बंगालच्या उपसागरातून येणारी उष्ण आणि आर्द्र हवा वर येते आणि थंड होते मग ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. बंगालच्या उपसागराच्या सान्निध्यात असल्याने येथे भरपूर आर्द्रता आहे. 1491 मीटर उंची असलेल्या खासी टेकड्यांमुळे हा ओलावाही घट्ट होतो.
कसं असतं जीवन?
मसिनरामतील मा (दगड) आणि सिनराम (तीक्ष्ण), ज्याचा अर्थ ‘दगडांची किनार’ आहे. येथील रहिवाशांसाठी छत्रीचा वापर ही एक सामान्य गोष्ट आहे. मासिनराम आणि चेरापुंजीत लोक बांबूपासून बनवलेल्या छत्र्या वापरतात ज्याला कानुप म्हणतात. ते कनुपला नेहमी सोबत घेऊन जातात जेणेकरून त्याचे शरीर नेहमी झाकले जाईल आणि पावसाळ्यातही हे सतत जवळ बाळगावे लागते. सततच्या पावसामुळे येथे शेती करणे अवघड झाले आहे. पण मासिनरामची सुपीक जमीन चहा, संत्री या पिकांसाठी अतिशय योग्य आहे.