Monday, September 16, 2024
Homeअध्यात्म‘या’ दिवशी साजरे केले जाईल हरतालिकीचे व्रत; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा...

‘या’ दिवशी साजरे केले जाईल हरतालिकीचे व्रत; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा आणि पौराणिक कथा

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती, त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा-आराधना करतात. यंदा ६ सप्टेंबर २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी.

हरतालिका तिथी

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत असेल. उदय तिथीनुसार, शुक्रवारी, ६ सप्टेंबर २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.

 

हरतालिका शुभ मुहूर्त

सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल. तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी २ तास ३१ मिनिटे असेल.

 

हरतालिका ब्रह्म मुहूर्त : सकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल.

 

अभिजीत मुहूर्त : सकळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असेल.

 

राहूकाळ : सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल.

 

हरतालिका शुभ योग

यंदा हरतालिकेच्या दिवशी रवि योग, शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. या दिवशी रवि योग सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी लागेल, जे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी समाप्त होईल.

हरतालिकेची पूजा कशी करावी?

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिका कथेचे पठण केले जाते आणि गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।। या मंत्राचा जप केला जातो.

हरतालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. ‘हर’ म्हणजे अपहरण करणे आणि ‘तालिका’ म्हणजे सखी, देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले, त्यामुळे या व्रताला ‘हरतालिका’ असे म्हटले जाते.

हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो, असे म्हटले जाते. हरतालिकेचे व्रत फक्त फळं खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -