भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या विशेष ब्रीफिंगमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानकडून पसरवण्यात आलेल्या दाव्यांना खोटं ठरवलं. पाकिस्तानने असा दावा केला होता की, त्यांनी भारताचे एस-400 मिसाइल बेस आणि ब्रह्मोस इन्स्टॉलेशन पूर्णपणे नष्ट केले आहेत. मात्र व्योमिका सिंह यांनी स्पष्ट केलं की, हे सर्व दावे निराधार आणि खोटे आहेत. उलट भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानलाच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
कर्नल सोफिया कुरैशींकडून पाकिस्तानचा पर्दाफाश
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हैराण झालेल्या पाकिस्तानने जम्मू-कश्मीरपासून पंजाबपर्यंत भारताच्या अनेक भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने आधीच पाकिस्तानच्या 26 हल्ल्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर निशाणा साधत प्रतिहल्ला सुरू केला.
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियन येथील एअरबेस, तसेच पसरूर आणि सियालकोट येथील विमानतळांवरील रडार साईट्सची यादी तयार करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा खुलासा केला.
10 मे रोजी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल कुरैशी म्हणाल्या की, “पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती नागरी वस्तींना लक्ष्य केल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानातील तांत्रिक केंद्रे, कमांड अँड कंट्रोल सेंटर, रडार साईट्स आणि शस्त्रसाठा असलेली ठिकाणे लक्ष्य करण्यात आली.”
रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियन येथील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना हवाई प्रक्षेपण, अचूक गोळाबारूद आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने लक्ष्य करण्यात आले. पसरूरमधील रडार साईट आणि सियालकोटमधील विमानतळ यांनाही अचूक गोळ्यांनी उद्ध्वस्त करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान
कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितलं की, स्कार्दू, भोली, सरगोधा आणि जैकोबाबाद येथील पाकिस्तानच्या विमानतळांना मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार प्रणाली निष्क्रिय करण्यात आली असून त्याचं हवाई क्षेत्र अस्थिर केलं गेलं आहे. याशिवाय, LOC वर पाकिस्तानचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्स आणि लष्करी पायाभूत सुविधा यांचेही गंभीर नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
दि. 7 मे रोजी पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी तळांचा नायनाट करण्यात आला. यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांचे मुख्यालयही समाविष्ट होते. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद, मरकज सुभान अल्लाह, तेहरा कलांमधील सरजल, कोटलीमधील मरकज अब्बास आणि मुजफ्फराबादमधील सैयदना बिलाल शिबिर हे सर्व तळ मलब्याच्या ढिगाऱ्यात बदलले गेले.
मदतीसाठी पाकिस्तानचा गयावया करू लागला
रॉयटर्सच्या अहवालानुसार, गुरुवारी पाकिस्तानने भारताने केलेल्या मोठ्या नुकसानीचा उल्लेख करत आंतरराष्ट्रीय संस्थांकडे अधिक कर्ज मागितले. पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाने त्यांच्या एक्स (Twitter) खात्यावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये म्हटलं होतं की, “दुश्मनांकडून मोठं नुकसान झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्ज देण्याची विनंती केली आहे. वाढत्या युद्धजन्य परिस्थिती आणि शेअर बाजारातील घसरण लक्षात घेता, तणाव कमी करण्यासाठी आम्हाला मदत करा.” मात्र, नंतर मंत्रालयाने या पोस्टपासून अंग काढून घेत सांगितलं की, अकाउंट हॅक करण्यात आलं होतं.
भारताच्या हल्ल्याने हादरला पाकिस्तान
ANI च्या सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणकोटमध्ये भारताने पाकिस्तानच्या एअर फोर्सचं एक विमान पाडलं. NDTV च्या रिपोर्टनुसार, भारतीय SAM (Surface-to-Air Missile) प्रणालीने सरगोधा एअर बेसजवळ पाकिस्तानच्या F-16 सुपरसॉनिक लढाऊ विमानांपैकी एक पाडलं. त्याचप्रमाणे, भारताने इस्लामाबादजवळील ‘AWACS’ (Airborne Warning and Control System) विमानाला देखील निशाणा बनवलं आहे. हे विमान हवाई युद्धात अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण करणारे जेट मानलं जातं. India Today च्या रिपोर्टनुसार, AWACS विमान पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात लक्ष्य केलं गेलं. याशिवाय, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे दोन JF-17 विमाने पाडली. पाकिस्तानच्या विमानतळांना आणि लढाऊ विमानांना मोठं नुकसान झालं आहे. तर गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या शेअर बाजारात 9 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली आहे.