कंधाणा फाटा परिसरातील शेंगदाणा ऑइल मिलला बुधवारी (दि.१६) सकाळी भीषण आग लागली. सटाणा व मालेगाव येथील अग्निशमन पथकाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
येथील भांगडिया कुटुंबीयांच्या शेंगदाणा ऑईल मिलमध्ये सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पलायन केले. परंतु आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. गोडाऊनमध्ये कोरड्या शेंगांची पोते मोठ्या प्रमाणात रचून ठेवली असून त्याठिकाणी आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात फैलावली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट तयार झाले. त्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. सटाणा नगरपरिषदेच्या तसेच मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.