एक वर्षाच्या चिमुरडीसमोरच तिच्या आईची हत्या करण्यात आली. महिलेच्या लिव्ह इन पार्टनरने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. गुजरातमधील सुरतमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणाचं गूढ उकलत आरोपीला अटक केली. महिला गेल्या तीन वर्षांपासून युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येचं कारणही स्पष्ट झालं आहे. सुरतमधील गौतमनगर सोसायटीत राहणाऱ्या स्नेहलताची तिच्या एका वर्षांच्या लेकीसमोरच हत्या करण्यात आली. दुपारच्या वेळेस पूजा करत असताना स्नेहलताचा लिव्ह इन पार्टनर प्रकाशने तिचा गळा चिरुन खून केला.
मुलीच्या नावे प्रॉपर्टी करावी, यासाठी स्नेहलता वारंवार आपल्याला त्रास द्यायची, असा दावा प्रकाशने केला आहे. या कारणावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वाद झडत असत. मंगळवारी स्नेहलता देवपूजा करत बसली होती. त्यावेळी प्रकाशने तिचा गळा चिरला आणि तिला त्याच अवस्थेत टाकून तो कामासाठी बाहेर गेला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रकाशची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. अखेर कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मी ऑफिसला गेल्यावर स्नेहलताला व्हिडीओ कॉल करायचो, मंगळवारीही मी नेहमीप्रमाणे व्हिडीओ कॉल केला, मात्र कुठलाच प्रतिसाद आला नाही, असं सुरुवातीला प्रकाशने पोलिसांना सांगितलं. संध्याकाळी मी घरी आलो, तेव्हा स्नेहलता मृतावस्थेत पडली होती, तर घरभर रक्ताचा सडा पडला होता, असा कांगावा सुरुवातीला प्रकाशने केल्याची माहिती डीसीपी सज्जन सिंह परमार यांनी दिली. पोलिसांसमोर त्याने चिमुरडीला कडेवर घेत रडण्याचं नाटकही केलं, मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याचा आविर्भाव मोडला.