Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : या ठिकाणी विधवा प्रथा व जात पंचायत प्रथा बंदीचा निर्णय

कोल्हापूर : या ठिकाणी विधवा प्रथा व जात पंचायत प्रथा बंदीचा निर्णय

हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाच्या पावलावर पाऊल टाकत शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड येथील ग्रामपंचायतीनेही गाव सभेत विधवा प्रथा बंदी बरोबरच जात-पंचायत प्रथा बंदीचा निर्णय घेतला आहे.

गावातील विधवा जर पुनर्विवाह करणार असेल तर ग्रामपंचायत ग्राम निधीतून संबंधित विधवेला २० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देणार आहे.

त्याच बरोबर गावातील विधवा, वृद्ध महिला यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून मोफत पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.विधवा महिला जर मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या न काढता समाजामध्ये वावरत असेल तर त्या विधवा महिलेचा घरफाळा व पाणीपट्टी तीन वर्षे माफ करण्याचा ठराव करण्यात आला आहे.

गावामध्ये जात-पंचायत प्रथा बंदीचा एक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. एखाद्या कुटुंबावर एखाद्या समाज बहिष्कार टाकत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच बहिष्कृत कुटुंबाच्या बाजूने संपूर्ण गाव उभे राहील, असाही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच वंदना कांबळे, माजी सरपंच संजय धनगर, सामाजिक कार्यकर्ते राहुलराज कांबळे, प्रकाश परीट, ग्रामपंचायत सदस्य शहानुर गवंडी, कमळ कांबळे, संगीता कांबळे, शोभाताई परीट आदीसह अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

दानवाडच्या सरपंचांची वर्षभरापूर्वीच प्रथेला मूठमाती…!

नवे दानवाडच्या सरपंच वंदना कांबळे यांचे पती हरिश्चंद्र कांबळे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले त्यानंतरही त्यांनी मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या काढले नव्हते. सरपंच वंदना कांबळे यांनी गावातील अनेक विकास कामांचा शुभारंभ गावातील विधवा महिलांच्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -