ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिरोळ ; शेअर मार्केटमध्ये विधवा महिलेची फसवणूक प्रकरणी दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्या महिलेला न्याय मिळवून दिला. ड्रीम मॉल शेअर मार्केट कंपनीला तसेच संचालक प्रकाश पाटील आणि देसाई (अथणी) यांना वाचवण्यासाठी सरसावलेल्या ‘त्या’ चार शासकीय कर्मचाऱ्यांनी विधवा महिलेकडून घेतलेले पैसे व्याजासह शनिवारी (दि. 4) परत केले.
पीडित विधवा महिलेने पैसे मिळाल्यानंतर दैनिक ‘पुढारी’ आणि अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. जयश्री गायकवाड, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गट विकास अधिकारी शंकर कवितके यांचे आभार मानले. तर, फसवणूक प्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीच्या उत्तराबरोबर धनादेश वटला नसल्याची फिर्याद न्यायालयात करावी, असा सल्ला देऊन तक्रार अर्ज परत घेण्यास भाग पाडले, असे पीडित महिलेने सांगितले. त्यानंतर पीडिताने अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. गायकवाड यांना वस्तुस्थिती सांगून तक्रार अर्ज दिला.
डॉ. गायकवाड यांनी पीडित महिलेची तक्रार घेऊन गोपनीय चौकशी सुरू केली. मात्र, दुसऱ्या बाजूला स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार का नाकारली, याची शेअर मार्केट गुंतवणूकदार, नागरिक, पंचायत समिती वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. पंचायत समितीच्या ग्रामविस्तार विभाग अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा ‘तो’ एजंट ग्रामसेवक आणि सहकारी लिडर-एजंटांनी जबाबदारी घेत विधवा महिलेचे पैसे परत केल्यामुळे कोंडिग्रे, आलास, नेज (कर्नाटक), जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, कुंभोज, शिरटी, निमशिरगाव सह इतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.