हुपरी येथील हुपरी-यळगूड रस्त्यावर चौपाटीजवळ तीनपानी जुगार अड्ड्यावर रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 54 जणांना अटक केली. यावेळी 46 हजार 980 रुपये रोख रकमेसह 6 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत अटक केलेल्यांची नावे समजू शकली नाहीत.
यामध्ये 16 मोटारसायकली व मोबाईल संच यांचा समावेश असून, जुगार अड्डाचालक व घरमालक फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गोरले यांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
येथे तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती, त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळून संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्याचा तपशील अद्यापपर्यंत देण्यात आला नसून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर रात्री उशिरापर्यंत दिले जात होते. युसूफ बागवान यांचा हा क्लब असल्याचे सांगण्यात आले असून, या घराचे मालक प्रकाश पाटील आहेत. या दोघांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.