सगळीकडेच गणेशोत्सवाचे उत्साह पूर्ण वातावरण आहे. या उत्सव पूर्ण वातावरणात एक दुर्दैवी घटना कोल्हापूर गगनबावडा रोड वर घडली आहे. ट्रक आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील विकास संभाजी तोरस्कर (20) आणि ऋषीकेश राजाराम कांबळे (21) हे दोन तरुण ठार झाले.
कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील बालिंग्यापासून काही अंतरावरील पाटील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी रात्री हा अपघात घडला.
ऐन गणेशोत्सवातील घटनेने चिंचवडे तर्फ कळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात तोबा गर्दी झाली होती. विकास आणि ऋषीकेश हे दोघे जिवलग मित्र होते. ते देखावे पाहण्यासाठी शुक्रवारी रात्री दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. पाटील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना घासल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. दोघेही पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकवर (एमएच 14 जीयू 8881) जोरात आदळले.
त्यात एकजण ट्रकच्या मागील चाकात चिरडला गेला; तर दुसरा ट्रकला धडकून जोरात फेकला गेला. यामध्ये ऋषीकेश जागीच ठार झाला; तर विकासचा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी अग्निशमन दलाच्या वाहनातून दोघांना तातडीने रुग्णालयात हलविले.
विकास तोरस्कर आणि ऋषीकेश कांबळे हे कॉलेज विद्यार्थी होते. विकास कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरी करून शिक्षण घेत होता. करवीरचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहाय्यक निरीक्षक सुरज बनसोडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.