ताजी बातमी ऑनलाईन टीम
फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. आज ड्रिम गर्ल वयाची 74 वर्षे पूर्ण करत आहेत. या वयामध्येही त्या चित्रपट आणि राजकारणात सक्रिय आहेत. 16 ऑक्टोबर 1948 मध्ये तामिळनाडूतील अम्मानकुडी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्हीएसआर चक्रवर्ती हे चित्रपटांचे निर्माते होते. हेमा यांनी वयाच्या 14 व्या वर्षीपासूनच अभिनय करण्यास सुरुवात केली. 1961 मध्ये तेलुगू चित्रपट ‘टपांडव वनवासन’मध्ये त्यांनी नृत्यांगनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना अनेक छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या. यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केले आणि मागे वळून कधीच पाहिले नाही.
हेमा मालिनी यांनी ‘सपनो का सौदागर’ (1968) या पहिल्या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राज कपूर होते. हेमा मालिनीविषयी बोलताना राज कपूर म्हणाले होते – ‘एक दिवस ही मुलगी सिनेमाची मोठी स्टार बनेल.’ यानंतर त्यांना एकापेक्षा एक चित्रपट मिळू लागले. बॉलीवूडमधील आपल्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. याच कारणामुळे त्यांचे नाव ‘ड्रीम गर्ल’ असे पडले.
शोले चित्रपटामुळे होऊ लागली चर्चा
हेमा मालिनी यांनी त्यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र शोले चित्रपटानंतर त्यांच्या विशेष चर्चा होऊ लागल्या. याचे म्हणजे हेमा आणि धर्मेंद्र याच सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमाची चर्चा पूर्ण इंडस्ट्रीत रंगली. फक्त चित्रपटामध्ये नाही तर दोघं खऱ्या आयुष्यात प्रेमात पडले होते. मात्र या प्रेमाला हेमा मालिनीच्या वडिलांचा विरोध होता.