कोल्हापूरात बंधारा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातली ही घटना आहे. धामणी नदीवरील बळपवाडी ते पाटीलवाडी दरम्यान शेतकऱ्यांनी घातलेला मातीचा बंधारा फुटला. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राधानगरी तालुक्यामधील गवसे पाटीलवाडीमध्ये धामणी नदीवर मातीचा बंधारा बांधण्यात आला होता. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र मिळून 5 ते 6 लाख रुपये खर्च करून हा मातीचा बंधारा बांधला होता. पण आज सकाळी सातच्या सुमारास अचानक पाण्याच्या प्रचंड दाबामुळे मातीचा बंधारा फुटला. बंधारा फुटल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बंधारा फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की शेतात लावण्यात आलेल्या पाण्याच्या मोटरी वाहून गेल्या आहेत. तसंच शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.
बंधारा फुटल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. बंधारा फुटण्याला पाटबंधारे विभाग पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसंच पाटबंधारे विभागाने आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, राधानगरी तालुक्यातील धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून ठिकठिकाणी अशाप्रकारचे मातीचे बंधारे तयार करत आहेत. उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ते अशाप्रकारचे बंधारे तयार करत आहेत.धामणी नदीवर अशाप्रकारचे नऊ बंधारे आहेत. त्यापैकी एक असलेला मातीचा बंधारा आज फुटला. बंधाऱ्याचे पाणी शेतामध्ये आल्यामुळे ऊसासोबत इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.