तोंडावर भुताचा मुखवटा, अंगावर काळी साडी, हातात सूप अन् लहान मुलांच्या डोक्यावर फटके… सांगलीतील तडकडताई नावाची ही परंपरा. भुताची आई, तडकडताई असं म्हणत सांगलीतील लोकं या खेळाला सुरूवात करतात.जेष्ठ आषाढ अमावस्येला तडकडताईंच्या या खेळाला सुरूवात झाली आहे.
ही परंपरा सांगलीकरांची प्रतिष्ठित अशी परंपरा आहे. मागच्या २५० वर्षापासून ही परंपरा चालू आहे. यावर्षी तडकडताईंचा मान कुंभार घराण्याकडे असून भुताची आई, तडकडताई म्हणत लहान मुले तडकडताईचे स्वागत करतात. त्यानंतर तडकडताई त्यांच्या डोक्यावर सूप मारते. सूप मारल्यानंतर मुलांवरील सर्व इडा पीडा टळतात असं मानतात.
दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि शहराचे संरक्षण करण्यासाठी तडकडताई गावात फिरत असते असा समज आहे.या परंपरेचे मूळ २५० पुर्वीच्या एका घटनेत दडलेले आहे. कर्नाटकमधील बदामी येथून ७ वाट्या मानवांनी पळवून आणल्या होत्या. या वाट्या सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठे पिरान या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं म्हणतात. चौडेश्वरी देवी गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या दैत्यांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी असा अवतार घेते असं म्हणतात.
जेष्ठ महिन्याच्या अमावस्येनंतर जोगण्या उत्सवाला सुरूवात होते. या उत्सवामध्ये तडकडताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते. तिचं लग्न लावण्यात येतं. त्यानंतर ती पौर्णिमेपर्यंत शहरात जोगवा मागते अशी ही परंपरा आहे. कालपासून या उत्सवाला सांगलीत मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली आहे.