यशवंत नगर हुपरी येथील चांदी असोसिएशनच्या दुकान गाळ्यांचे शटर उचकटून तर काही ठिकाणी खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व कच्च्या चांदीसह ११ लाख ९० हजार १९६ रुपयांवर डल्ला मारुन पोबारा केला आहे. घटनास्थळी डीबी पथकासह श्वानपथक दाखल झाले होते. मात्र चोरांचा माग लागला नाही. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली असून हुपरी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हुपरी येथील पोलिस ठाण्याला लागून असलेल्या असोसिएशनच्या दुकान गाळ्यांतील लागोपाठ तीन दुकान गाळे फोडून धाडसी चोरी केली आहे.
काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये स्वप्नील मगदूम यांच्या गाळ्याची शटरची कडी तोडून विविध टंचाचा २४ किलो ४० ग्रॅम किंमतीचा अंदाजे ९ लाख ७३ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल, आण्णासो हांडे यांच्या गाळ्यातील रोख ३ हजार रुपये व नामदेव सुतार यांच्या दुकानातील
४७०० ग्रॅम वजनाचा चांदीचा कच्चा गाळ किंमत २ लाख १४ हजार असा एकूण ११ लाख ९० हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. स्वप्नील दादासो मगदूम (रा. बिरदेवनगर रेंदाळ) यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघमारे, पो. ना.
निवृत्ती माळी व डीबी पथकासह श्वानपथक दाखल झाले होते. मात्र श्वान परिसरातच घुटमळले.