शेट्टींनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट


महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यांवरील पुलामुळे व भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले होते. (raju shetti meet nitin gadkari) महापुराची पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमांनी बांधण्यात याव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.


२००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलली असल्याचे जाणवले. जागतिक तापमान वाढीत बदल होत असल्याने यावर्षी एकाच दिवसात जवळपास ८५० मिलिमीटर हून अधिक पाऊस आंबोलीपासून ते महाबळेश्वरपर्यंतच्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाला व हे पावसाचे पाणी वेगाने नदीपात्रात आले. असे शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.

दोन दोन किमीचा भराव…
कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पुलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नद्या पात्रापासून दोन -दोन किलोमीटरपर्यंत पाणी पसरते. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते, असे शेट्टी यांनी सांगितले.


मी सांगली, कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थीती निदर्शनास आणून दिली. या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमांनी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल, असे शेट्टी म्हणाले.


यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या १५ दिवसांत कोल्हापूर, सांगली व बेळगाव या तीनही जिल्ह्यातील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञाचं पथक पाठवून देणेसंदर्भात मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक, अमित पाटील, सागर मादनाईक, हर्षद इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group