30 Years of Kajol: बॉलिवूडमध्ये काजोलने पूर्ण केले तीन दशक, अजय देवगनने दिल्या अशा शुभेच्छा

प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने (Actress Kajol) चित्रपटसृष्टीतील तीस वर्षे पूर्ण केली आहेत. तीन दशकांच्या या कारकिर्दीत काजोलने अनेक चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. या अभिनयाच्या जोरावर काजोल आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. काजोलने 31 जुलै 1992 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बेखुदी’ (Bekhudi Movie) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काजोलच्या ( 30 Years of Kajol) या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले आहे. या प्रवासात काजोलने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘बाजीगर’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘गुप्त’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘फना’, ‘तान्हाजी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 30 वर्षाच्या या यशस्वी प्रवासाबद्दल काजोलने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, पती अजय देवगनने (Ajay Devgan) पोस्ट शेअर करत काजोलला शुभेच्छा दिल्या आहे. चाहते देखील काजोलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

बॉलिवूडमधील काजोलच्या या 30 वर्षांच्या प्रवासावर तिचा पती आणि अभिनेता अजय देवगननेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये अजय देवगनने ‘तान्हाजी’ चित्रपटातील काजोल सोबतच्या त्याचा फोटो शेअर करत लिहिले, ‘बॉलिवूडमधील तीन दशके! तुम्ही खूप छान काम केले आहे. खरे सांगायचे तर ही फक्त सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, अजून बरेच चित्रपट आणि आठवणी बाकी आहेत.

काजोलने केला व्हिडीओ शेअर

बॉलिवूडमध्ये 30 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तीस वर्षांच्या प्रवासातील निवडक चित्रपट जपण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये ‘बेखुदी’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘गुप्त’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘फना’, ‘माय ने इज खान’, ‘हेलिकॉप्टर इला’ आणि ‘त्रिभंग’ या चित्रपटांची झलक आहे. काजोलने व्हिडिओसोबत एक सुंदर नोट देखील लिहिली आहे, ज्यात काजोलने लिहिले, ‘कोणीतरी विचारले की मला कसे वाटते? खरे तर हा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही. माझ्यावर बिनशर्त प्रेमाचा वर्षाव करणार्‍या सर्वांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.

30 वर्षाच्या या यशस्वी प्रवासाबद्दल चाहत्यांनी काजोलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. काजोलच्या पोस्टवर शुभेच्छा देत चाहते तिला ‘क्वीन’ म्हणत आहेत. अभिनंदन करताना एका यूजरने लिहिले, ‘खूप अभिनंदन! आता पुढचे तीस वर्षे आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत. दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘तुमचा ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा माझा फेव्हरेट आहे. यासह अनेक प्रतिक्रिया देत चाहते शुभेच्छा देत आहे.

 

Join our WhatsApp group