ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाविकास आघाडी सरकारनं राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावले आहेत. मात्र, हे निर्बंध फेब्रुवारीपर्यंत शिथील होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितलं. मात्र सरकारला स्वपक्षीयांच्या नेत्यांनीच घरचा आहेर दिला आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मग पर्यटन स्थळं किमान 50 टक्क्यांच्या मर्यादेत सुरु का करत नाहीत ?, असा सवाल काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी केला आहे.
महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीचीही संचारबंदी आहे का? असा प्रश्न सध्या बाजारपेठांमधील दृश्यं पाहिल्यावर पडतो. विविध बाजारपेठांमध्ये खच्चून गर्दी आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यात कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. पण विरोधाभास पाहा किती? जिथं गर्दी होते, त्या बाजारपेठांच्या ठिकाणी निर्बंध नाहीत आणि शाळा मात्र बंद, महाविद्यालयं बंद, पर्यटनस्थळंही बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. कारण काय तर कोरोना वाढणार.
शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळावरुन कोरोना वाढतो. मग मार्केटमधल्या गर्दीमुळं कोरोना मरतो का ? त्यामुळंच चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा पर्यटकांसाठी बंद का ? स्थानिक जिप्सी चालकांच्या रोजगाराचं काय ? असा सवाल धानोकर यांनी सरकारला केलाय. बाळू धानोकरांबरोबरच शिवसेने आमदार अंबादास दानवे यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं खुले करण्याची मागणी दानवे यांनी या पत्रातून केली आहे.
पर्यटनस्थळांवर बंदी आणल्यानं, मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमधल्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. पर्यटनाचे सर्व पॉईंट, तसंच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक बोट क्लब बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान होतंय. तर घोडे मालकांनाही मोठा आर्थिक फटका बसलाय. दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालयंही सुरु करण्याची मागणी होतेय. रेस्टॉरंट, खासगी कार्यालय आणि सलून 50 टक्के क्षमतेनं सुरु आहेत. मग शाळा आणि महाविद्यालांनाही 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याची परवानगी द्या, अशी मागणी तज्ज्ञांनी केलीय.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळं पर्यटन बंद राहिले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. शाळा, महाविद्यालये बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांचाही मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला. त्यामुळं 50 टक्के उपस्थितीत पर्यटन स्थळं आणि शाळा, महाविद्यालयं कसे सुरु करता येईल, याचा सरकारनं विचार करणं गरजेचं बनलं आहे.
कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -