Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरभर पावसात महिलांचा सात तास मायक्रो फायनान्स विरोधात आंदोलन

भर पावसात महिलांचा सात तास मायक्रो फायनान्स विरोधात आंदोलन


मायक्रो फायनान्स च्या अन्यायी वसुलीविरोधात महिलांनी तब्बल सात तास भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या मांडला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मागण्यांबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्यांसाठी आक्रमक असलेल्या महिलांच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिवसभर तणावाचे वातावरण होते.


महापूर आणि कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती गंभीर बनली. अशा परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुलतानी पद्धतीनेे वसुली सुरू आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी चौकशी समिती नेमली होती. त्यात दोषी आढळलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी, नियमांचे उल्लंघन करून वसुली करणार्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशा वसुलीस स्थगिती द्यावी या मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली कर्जदार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
ताराराणी चौकातून सकाळी साडेअकरा वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. पाऊस, चिखल याची तमा न बाळगता मोर्चेकरी महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले. एका सहा महिन्याच्या मुलासह काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून जात होता.


आंदोलकांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. मागण्यांबाबत लेखी पत्र द्यावे, असे सांगत तीन वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. तीन वाजता जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या पत्रातील काही मुद्द्यांना आक्षेप घेण्यात आला. हे पत्र स्वीकारले नाही. यावेळी झालेल्या चर्चेत पुन्हा नव्याने पत्र देण्याचा निर्णय झाला.


दरम्यान, आक्रमक झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात धाव घेतली. काही महिलांनी रस्त्यावरच लोळण घेत रास्ता रोको केला. महिला घोषणा देत शंखध्वनीही करत होत्या. या सर्व प्रकाराने पोेलिसांची धावपळ उडाली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी महिलांची समजूत काढली.


यानंतर महिला पुन्हा आंदोलनस्थळी आल्या. यानंतरही अपेक्षित पत्र तयार करण्यास विलंब होत असल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी पुन्हा महिलांची समजूत काढत वातावरण शांत केले.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार रंजना बिचकर यांनी पत्र आंदोलकांच्या हाती सुपूर्द केले. अपेक्षित पत्र मिळाल्याने महिलांनी जल्लोष केला. दिव्याताई मगदूम, ए. ए. सनदी, बिस्मिला दानवाडे, रूपाली जाधव, गौतमी कांबळे, वैशाली मगदूम, समीर दानवाडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

जिल्हाधिकार्यांचे नऊ मुद्द्यांचे पत्र
आंदोलकांना जिल्हाधिकारी रेखावार यांनी नऊ मुद्द्यांवर पत्र दिले. त्यानुसार कर्जमाफीबाबत सादर केलेल्या प्रस्तावाची प्रत आंदोलकांना देण्यात येणार. चौकशी समितीची कागदपत्रे उपलब्ध करून देणार. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या कंपन्यांवर कारवाईसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे, त्याची प्रत देणार, बेकायदेशीर वसुलीविरोधात कर्जदाराने कंपनीविरोधात तक्रार केल्यास पाठपुरावा करू, एफआयआर दाखल करून तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना पोलिसांना देण्यात येतील आदी मुद्द्यांचा जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.


महिला जागेवरून हलल्या नाहीत
वरून कोसळणारा पाऊस, खाली चिखल आणि पाणी, अशा परिस्थितीत रस्त्यावर बसलेल्या महिला आंदोलक सात तास जागेवरून हलल्या नाहीत. पावसात भिजल्याने अनेक जणी थंडीने गारठल्या होत्या. तरीही त्यांचा आक्रमकपणा कमी होत नव्हता. विशेष म्हणजे अनेक महिला लहान मुलांना घेऊन सहभागी झाल्या होत्या.


काठ्या घेऊन महिला आंदोलनात
आंदोलनात 600 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. अनेक महिलांनी एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. हातात काठ्या घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. प्रशासनाने न्याय दिला नाही तर कंपन्यांची कार्यालये फोडू, असा इशारा प्रारंभीच त्यांनी दिला होता. दरम्यान, महिलांनी पाण्याचे कॅन आणले होते. त्यावर देशी दारू असे फलक होते. पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्हाला दारू तरी विकू द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -