ताजी बातमी ऑनलाइन टीम
मटण,चिकन विक्री दुकानांतील सांडपाणी थेट पंचगंगा नदीतच मिसळते . शहरात आणि नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये मटण, चिकन आणि मासे यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या दुकानांमधून घन कचरा आणि सांडपाणी ही अधिक तयार होते. हा कचरा किंवा सांडपाणी थेट नदीमध्ये गेले तर नदी प्रदूषण वाढीस हातभार लागतो. शहरामध्ये काही प्रमाणात मांस विक्रीमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर आणि सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, ग्रामीण भागात अशा प्रकारे प्रक्रिया करण्याची व्यवस्था उभी करणे क्रमप्राप्त आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये मटण विक्री करणारी १५३ दुकाने आहेत, तर चिकन विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या १२० इतकी आहे. मासे विक्री करणारी दुकाने सुमारे ३५ आहेत. मटण मार्केट आणि फिश मार्केटमधील कचरा रोज उचलला जातो. झूम प्रकल्पावर या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. तर येथील सांडपाणी गटारीमधून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर जाते. ग्रामीण भागातील मांस विक्री दुकानांमधील सांडपाणी मात्र ओढे, नाल्यातून ओढे किंवा नाल्यातून नदीत मिसळते. एकूण सांडपाण्याच्या प्रमाणात मांस विक्री करणाऱ्या दुकानांमधील सांडपाण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी याचा परिणाम गंभीर आहेत.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात दररोज २०६० किलो घनकचरा मांस विक्री दुकानातून तयार होतो, तर १२ हजार ६६ लिटर सांडपाणी दररोज तयार होते. यातील किती सांडपाणी (river) नदीत जाते याचा नेमका आकडा नसला तरी बहुतांशी सांडपाणी नाले, ओढे यांच्यात मिसळते व पुढे नदीला मिळते असे चित्र आहे. रक्तमिश्रीत पाणी किंवा मांसाचे तुकडे थेट पाण्यात गेले तर पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जलचरांचा मृत्यू होतो. तसेच पिसे, मांस यांचे विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळेही पाणी दूषित होते. यासाठी गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करून सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया केली पाहिजे. तरच नदीची शुद्धता टिकेल. प्रदूषणाची तीव्रता कमी होईल.
पंचगंगा नदी जीवनदायिनी आहे. पहिले कोल्हापूर पंचगंगेच्या तीरावर स्थापन झाले. ही नदी नसती तर आपले अस्तित्व काय असते? पंचगंगेच्या पाण्यावरच कोल्हापूरकरांनी कर्तबगारी गाजवली आहे. नदी स्वच्छ व निरोगी असणे म्हणजे आपले आरोग्य निरोगी असणे, असे आहे. मात्र, जेव्हा पंचगंगेच्या प्रदूषणाची छायाचित्रे पाहतो, तेव्हा वेदना होतात. लंडनमधील स्वच्छ पाण्याची थेम्स नदी पाहिली आहे. त्या वेळेस मला पंचगंगेची आठवण झाली. नदी पाहिल्यानंतर एखाद्या राज्याची सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य व भौतिकदृष्ट्या कल्पना करता येते. पंचगंगेच्या स्वच्छतेबाबत सजग असायला हवे. ती स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.