कोरोनाचा धोका अद्याप म्हणावा तसा आटोक्यात आलेला नाही. अद्यापही कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. याकडे लोक कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहत आहेत. या प्रकरणात, आपण खूप सावध असणे आवश्यक आहे. पण, आता लोकांना कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलची माहिती झाली आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम 60 वर्षांवरील लोकांवर आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांवर झाला होता, परंतु आता कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे लहान मुलांमध्ये समोर येत आहेत.
दरम्यान लहान मुलांसाठी कोरोनाची चौथी लाट घातक असल्याचे म्हटले जाते. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेक मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे, आता किमान लसीकरण होईपर्यंत रिमोट लर्निंग मोडवर आग्रह पालक धरत आहेत. माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील 107 नवीन कोरोना प्रकरणांपैकी 30% पेक्षा जास्त प्रकरणे मुलांमध्ये नोंदवले गेले आहेत. तसेच, दिल्लीतील अनेक मुलांनाही विषाणूची लागण झाली आहे.
यावर तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की, घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या जीवघेण्या कोरोनाच्या प्रादुर्भावात देशात घट झाली आहे. देशात दररोज एक हजारांहून कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्यानंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध दोन वर्षांनंतर संपले आहेत. तरीही मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोनाबाधिताच्या आकडेवारी घट होत असतानाच कोरोनाच्या XE या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, लहान मुलांचा एक मोठा वर्ग अद्याप लसीकरण न झाल्यामुळे, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात आणि त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यांसारख्या वरच्या श्वसनमार्गाच्या लक्षणांचा समावेश होतो, असे एका खासगी वृत्तपत्राला मुलाखत देताना डॉ. अवी कुमार यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांनी निदर्शनास आणले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना निरोगी जीवनशैली, वेळेवर खाणे-झोपणे, स्वच्छता पद्धतींचे पालन करणे, तसेच लसीकरणास पात्र असलेल्या मुलांनी ते लवकरात लवकर घ्यावे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैली देण्यावर पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. प्राथमिक स्वच्छतेची घरामध्ये तसेच शाळेच्या आवारात काळजी देखील घेतली पाहिजे, ज्यात स्वच्छता आणि हात धुण्याच्या पद्धतींचा समावेश आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचेच उत्परिवर्तन असल्यामुळे, लसीमुळे नवीन प्रकारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीसाठी पात्र असलेल्या मुलांनी त्यांची लस घेतले पाहिजे, कारण ते या प्रादुर्भावाच्या गंभीर स्वरूपापासून संरक्षण करेल, असे डॉ गुरलीन सिक्का यांनी सांगितले.