तुम्ही एसी, फ्रीज, टिव्ही यांसारख्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर ‘स्टार रेटिंग’ पाहिलं असेल.. जितके जास्त ‘स्टार रेटिंग’ तितकी जादा वीजबचत.. असं साधं गणित या स्टार रेटिंगमागे असतं.. मात्र, त्यामुळे ग्राहकांना कोणती वस्तू घ्यावी, याची माहिती क्षणात समजते.. वस्तूंचा दर्जा या रेटिंगमुळे लगेच लक्षात येतो..
स्टार रेटिंगमुळे इलेक्ट्राॅनिक वस्तूंचा दर्जा लक्षात येत असला, तरी तुम्ही वापरता त्या गाड्यांचे टायरचे काय..? टायर घेताना फक्त मोठ्या कंपन्यांची नावे पाहून घेतले जातात. मात्र, त्यातही अनेकदा फसवणूक होते. निकृष्ट माल तुमच्या माथी मारला जातो.. मात्र, आता असं होणार नाही.. कारण, टायरचा दर्जा ठरवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचे मायलेज वाढणार..
वाहनचालकांची आता लवकरच खराब टायरपासून सुटका होणार आहे. एसी-फ्रीजप्रमाणे आता टायर्ससाठीही ‘स्टार रेटिंग’ दिलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास तर सुरक्षित होईलच, शिवाय गाड्यांचे मायलेजही वाढण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकार लवकरच टायर्ससाठी ‘स्टार रेटिंग’चा नियम लागू करण्याची शक्यता आहे.
सध्या टायरच्या गुणवत्तेसाठी बीआयएस (BIS) नियम लागू आहे, पण आता ‘पॉवर रेटिंग’प्रमाणे टायरसाठीही ‘स्टार रेटिंग’ दिले जाणार आहे. टायरला दिल्या जाणाऱ्या 5 स्टार रेटिंगमुळे इंधन वाचून गाड्यांचे मायलेज वाढणार आहे. स्टार रेटिंगद्वारे खराब टायर्सच्या आयातीवरही बंदी आणण्याची सरकारची योजना आहे.
टायरच्या किंमती वाढणार..
टायरला दिल्या जाणाऱ्या 5 स्टार रेटिंग टायरमुळे 5 ते 10 टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे आत्मनिर्भर भारत मिशनसाठीही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे भारतीय कंपन्या दर्जेदार टायर बनवू शकतील. ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (ARAI) याबाबत टायर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा केली आहे.
दरम्यान, टायरसाठी 5 स्टार रेटिंग पद्धती सुरु झाल्यानंतर त्याच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सामान्य टायरच्या तुलनेत 5 स्टार रेटिंग असणाऱ्या टायरची किंमत किती जास्त असेल.. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान टायरच्या किमतीत यावर्षी 8 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कच्चा माल आणि कमॉडिटीच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी टायरचे दर वाढवले आहेत.