नैसर्गिक जैव विघटनशील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार कराव्यात, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेबाबत पीओपी मूर्तीबंदीबाबत शहरातील मूर्तिकार संघटना व प्रतिनिधींची बैठक आयुक्त कार्यालयात झाली. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण (pollution) मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रदीप मोरे, पर्यावरण समिती सदस्य उदय गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश उत्सवाकरिता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी असल्याने व मूर्तीसाठी कोणताही विषारी रंग न वापरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणपूरक म्हणजे मातीच्या व शाडूच्या मूर्तीचा वापर करावा. यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन देणे व जनजागृतीसाठी बैठक घेतली.
पर्यावरण समिती सदस्य गायकवाड यांनी मूर्तिकारांनी मूर्तीना घातक रंगाचा वापर न करता वॉटर रंग म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करावा. यामुळे विसर्जन कुंड अथवा खणीमध्ये प्रदूषण होणार नाही. नदी व तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये व तलावामध्ये मूर्ती विर्सजन करण्याऐवजी विसर्जन कुंडामध्येच करूया. शाडूच्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर कुंभार समाजाने त्या मातीचा पुनर्वापर करावा, असे सांगितले. डॉ. बलकवडे यांनी नदी व तलावाचे प्रदूषण (pollution) रोखण्यासाठी शाडूच्या मूर्ती बनविण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. कुंभार समाजाने या वर्षी नोंदणी झालेल्या मूर्तीची संख्या महापालिकेस कळवावी. जेणेकरून विसर्जन कुंडाचे नियोजन महापालिकेस करता येईल, असे सांगितले.
उपायुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, माजी महापौर मारुतराव कातवरे, कुंभार समाजाचे प्रकाश कुंभार, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी माजगावकर, एकनाथ माजगावकर, लक्ष्मण वडणगेकर व मूर्तिकार उपस्थित होते.