ताजी बातमी ऑनलाईन टीम
दरवर्षी 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती म्हणून (Gandhi Jayanti 2022) साजरा केला जातो. संपूर्ण देश हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. गांधी जयंतीनिमित्ताने बापूंच्या आदर्शांची आठवण केली जाते. महात्मा गांधीजींच्या विचारांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लाखो लोक प्रभावित आहेत. गांधी जयंतीच्या दिवशी देशभरात बापूंच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतात. यानिमित्ताने त्याच्या शिस्तबद्ध आणि संयमी जीवनावर प्रकाश टाकला जातो. या दिवशी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. गांधी जयंतीनिमित्त शाळा-महाविद्यालयांमध्ये भाषण आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. तुम्हाला गांधी जयंतीनिमित्त भाषण आणि निबंध तयार करायचा असेल तर तुम्ही आम्ही येथे खाली दिलेला मजकूर वापरून तुमचे भाषण आणि निबंध तयार करू शकता.
असे करा प्रभावी भाषण
भाषणाची सुरुवात…
मंचावर उपस्थित सर्व पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या सर्व सहकारी मित्र मैत्रिणींनो! आज गांधी जयंतीनिमित्त आपण सगळे इथे जमलो आहोत. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आणि यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली जाते. महात्मा गांधींना लोक प्रेमाने बापू म्हणत. गांधीजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या अहिंसक मार्गांसाठी ओळखले जातात. गांधी जयंती हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील जगभरात साजरा केला जातो.
गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो. राजघाट ही गांधीजींची समाधी आहे. गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर नेते बापूंच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटावर येतात. प्रार्थना सभेत राम धुन आणि गांधीजींचे आवडते भजन गायले जाते. गांधीजींची हत्या झालेल्या दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्येही श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि भजन गाण्याचा कार्यक्रम होतो.
महात्मा गांधींनी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले आणि नंतर इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याची पॅक्टिस केल्यानंतर 1915 मध्ये ते भारतात परतले आणि येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग बनले. त्यांनी आपल्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेने स्वातंत्र्य चळवळीला व्यापक रुप दिले. महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. त्यामुळे ते देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे आदर्श बनले.