Shilpa tulaskar: निर्माते आणि कलाकार-तंत्रज्ञ यांच्यातील वाद काही नवीन नाही. पण गेल्या काही दिवसात निर्मात्यांनी कलाकारांचे तंत्रज्ञांचे पैसे बुडवल्याच्या, सेट वर चुकीची वागणूक दिल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
याच विषयावर अत्यंत परखड शब्दात भाष्य केले आहे ते अभिनेत्री शिल्पा तुळसकरने. शिल्पाने अत्यंत मोजक्या शब्दात निर्मात्यांची पोलखोल केली आहे
अभिनेत्री शिल्पा तुळसकर सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत तिने ‘अनामिका’ हे पात्र साकारले असून ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. शिल्पाने केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही बरेच काम केले आहे. आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका मालिका-सिनेमातून साकारल्या आहेत. शिल्पाला मनोरंजन विश्वातील दांडगा अनुभव आहे. अनेक निर्मात्यांसोबत काम केल्याने निर्मात्यांचे गुण-अवगुण तिने चांगलेच हेरले आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने यावर रोखठोक भाष्य केले आहे.
शिल्पा म्हणाली, ‘एका कलाकाराच्या निर्मात्याकडून काय माफक अपेक्षा असतात. तर एक स्वच्छ मेकअप रूम, एक स्वच्छ वॉशरूम, वेळेवर ब्रेक्स, काम वेळेवर पूर्ण करणं आणि कलाकाराला लागणाऱ्या प्रॉपर्टी पुरवणं. या अगदी बेसिक गोष्टी अपेक्षित असतात.’
पुढे ती म्हणाली, ‘निर्माते एका चित्रपटातून किंवा कलाकृतीतून मिळणारी मिळकत लगेच दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये लावतात. त्यामुळे हातात आलेली रक्कम गेल्याने लोकांची देणी थकतात. कलाकार तंत्रज्ञांचे मानधन थकवले जाते आणि यामुळे निर्मात्यांचं नाव खराब होतं. केवळ पैसे वेळेवर देणारा निर्माता उत्तम निर्माता होत नाही, तर रोजच्या रोज सेटवर या सगळ्या गोष्टींची दखल घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.’
‘बरेच निर्माते अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कंजूसी करतात. बऱ्याच लोकांचे पैसे कमी करतात. यामुळे संपूर्ण युनिटवर त्याचा परिणाम होतो. कित्येक निर्माते चहा कॉफीसुद्धा अगदी ठरवूनच देतात, एवढा बजेटचा प्रॉब्लेम खरंतर हिंदी किंवा मराठी कुठल्याच इंडस्ट्रीत नाहीये. काही निर्माते तर सेटवर मॅगी सुद्धा करू देत नाहीत कारण गॅस वाया जातो. बऱ्याचदा टेक्निशियनचे पैसे कापले जातात, त्यांचे पैसे कमी करून निर्माता मोठा होत नाही.’ असे सडेतोड विचार शिल्पाने मांडले आहेत.