येत्या आठवड्याभरात शहरातील साफसफाई व गटारीसाफ न केल्यास आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अलर्ट झालेल्या आरोग्य विभागाने युध्द पातळीवर शहरातील साफसफाईचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला जात आहे. त्याचबरोबर वेळच्यावेळी गटारींची साफसफाई केली जात नसल्याने विविध भागातील नागरिकांची ओरड होत आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गटरी तुंबण्याच्या प्रकारामुळे अनेक भागात डेंग्यूसदृश, ताप, खोकला, सर्दी अशा आजारांचे रूग्ण वाढत चालले आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने पूरग्रस्तभागातील गटारी तसेच सारण गटारी स्वच्छ केल्याचा दावा केला होता. मात्र अनेक ठिकाणी गटरी तुंबण्याचा प्रकार वाढत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात दखल घेवून आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून येत्या आठ दिवसात युध्द पातळीवर गटारीची साफसफाई स्वच्छता न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार अलर्ट झालेल्या आरोग्य खात्याने गटारी काळ्या ओढ्याची स्वच्छता करावी पुरग्रस्त भागातील गटारी तसेच सारण गटारी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले असले तरी शहरी भागातून गेलेल्या काळ्या ओढ्याची म्हणावी तशी साफसफाई केली गेली नाही. काळ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचला आहे. त्यामुळे एखादा मोठा पाऊस झाला तर पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये पसरू शकते. तेव्हा आयुक्तांनी या संदर्भात लक्ष देवून काळ्या ओढ्याची स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.
साफसफाईची मोहिम युध्द पातळीवर राबवण्यास सुरूवात केली आहे. पूरस्थिती भागातील गटारींची स्वच्छता मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.