कोल्हापूर जिल्ह्यात महायुती ताकदीने पाय रोवून उभारण्याचे प्रयत्न करीत असताना, आता महायुतीला आतूनच धक्के बसू लागले आहेत. ताराराणी पक्ष आणि जनसुराज्यने जाहीर केलेल उमेदवार, यड्रावकरांचा नवीन पक्ष आणि महाडिक युवा शक्तीने व्यक्त केलेली खदखद यामुळे महायुतीत ‘ऑल इज वेल’ परिस्थिती नाही.
आता नेते या सगळ्यावर कशा प्रकारे मार्ग करतात ते पाहावे लागेल. या पेचावर तोडगा काढण्याचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ पातळीरील नेत्यांकडून सुरू होतील, असे संकेत आहेत.
मुळातच जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत आणि आता त्यांच्यावरच भाजपची मदार आहे. महाडिक कोणत्याही पक्षात असले तरी ते आपल्या युवा शक्तीच्या माध्यमातून आपली स्वतंत्र राजकीय ताकद जपत असतात आणि वेळ आल्यावर ते ताकद दाखवतही असतात. कोल्हापूर दक्षिणमधून धनंजय यांचे चुलतभाऊ अमल महाडिक इच्छुक आहेत, तर कोल्हापूर उत्तरमधून त्यांचे चिरंजीव कृष्णराज इच्छुक आहेत. भाजपमध्ये त्यांनी चांगले राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांची आग्रही भूमिका असणार हे उघड आहे. आता युवा शक्तीच्या माध्यमातून स्वतंत्र ताकद दाखवून ते आपल्याला अपेक्षित असलेले वळण राजकारणाला देतात का, हे पाहावे लागेल.
पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्यात राजकीय वैर आहे, तर समरजित घाटगे यांच्याशी त्यांचे नातेसंबंध आहेत. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या घाटगे घराण्यातील आहेत; मात्र युवा शक्तीच्या मेळाव्यात मुश्रीफ आणि घाटगे या दोघांकडूनही युवा शक्तीला सन्मान मिळत नसल्याची खदखद त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली आहे. यानिमित्ताने महाडिक गटात काय चालले आहे, हे उघड झाले आणि सारवासारव करतानाच आपण महायुतीला सत्तेवर आणायचे आहे, असे सांगत धनंजय महाडिक यांनी सावध भूमिका घेतली; मात्र यातून त्यांची राजकीय भूमिका लपून राहिली नाही.
एका बाजूला हे होत असतानाच माजी राज्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडी असा सवतासुभा उभारला आहे. या माध्यमातून ते विधानसभेची शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवतील, तर आघाडीच्या माध्यमातून हातकणंगले आणि इचलकरंजी मतदारसंघातून त्यांनी उमेदवार उभे केल्यास आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे.
यड्रावकर यांची आघाडी पूर्वी होती. आता त्यांनी ती नोंदणीकृत करून घेतल्याने सर्व निवडणुकीत आघाडीचे उमेदवार उभे करण्याला त्यांना मोकळीक मिळाली आहे. आता ही आघाडी महायुतीचा घटक म्हणून काम करणार की अन्य राजकीय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
त्याचवेळी भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने इचलकरंजीतून राहुल आवाडे व हातकणंगलेतून जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. ते स्वतः पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. त्यांनी करवीर मतदारसंघातून संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता आवाडे आणि कोरे यांनी जाहीर केलेल्या अन्य मतदारसंघातील उमेदवारांमुळे महायुतीला धक्का बसणार आहे.
नेत्यांची सावध भूमिका
प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे स्वतंत्र पक्ष आणि धनंजय महाडिक युवा शक्तीने घेतलेली भूमिका या सध्या महायुतीला धक्का देतील, असे वाटत आहे. मात्र जागा वाटपाच्या चर्चेत नेते यातून मार्ग काढला जाणार हे निश्चित आहे. महायुती आणि महाविकास आघाडी त्याचबरोबर होऊ घातलेली तिसरी आघाडी, यामुळे राजकीय चुरस वाढली असतानाच नेत्यांची भूमिका सावध असणार आहे.