पंचगंगेला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण सुटता सुटेना. दूषित पाणी थेट नदी पात्रात मिसळत असल्याने दिवसेंदिवस हा प्रदूषणाचा विळखा पंचगंगेभोवती अधिकच घट्ट होत आहे. गुरुवारी (दि. 20) नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मृरत माशांचा खच पाहायला मिळाला होता. या माशांचा मृत्यू नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.
जलचरांसाठी पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (डीओ) प्रमाण महत्त्वाचे असते. हे प्रमाण निश्चित मानकाच्या खाली गेल्यास जलचरांचा मृत्यू होतो. पंचगंगेतील मृत माशांचा खच पाहून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या क्षेत्रातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवले होते.
यातून जो प्राथमिक अहवाल समोर आला, त्यामध्ये पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी 4.7 इतकी खालावल्याचे एमपीसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले. दुसर्याच दिवशी ऑक्सिजनचे प्रमाण 7 पर्यंत वाढले. या अहवालानुसार माशांचा मृत्यू ऑक्सिजन कमी झाल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अहवालातील या कारणाचा नेमका शोध घेण्यासाठी पाण्याचा पीएच, बीओडी, सीओडी, नायट्रेट, फेकल कोलिफॉर्म तसेच हेवी मेटल्स तपासण्यात येत आहे.