गेल्या काही काळापासून जगभरात कोरोना महामारीने खळबळ उडवून दिली आहे. हे संकट म्हणावे तसे अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. कोरोना झाल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागल्याचेही समोर आले आहे. कोरोनामुळे हृदय आणि न्यूरोलॉजिकल लक्षणे अनेकांना दिसली. पण आणखी एक धक्कादायक निकाल आता समोर आला आहे. शुक्राणूंवर कोरोनामुळे परिणाम होत असल्याचे आयआयटी बॉम्बे आणि जसलोक हॉस्पिटलच्या प्रजनन केंद्राच्या नवीन संयुक्त अभ्यासात समोर आले आहे. पुरुष प्रजनन प्रणालीवरही याचा परिणाम होत असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे.
कोरोनानंतर शुक्राणूंच्या पेशींमधील प्रथिने विपरित पद्धतीनं बदलतात, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असे जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. फिरोजा पारीख आणि आयआयटी बॉम्बे येथील प्रोटीओमिक्स प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले.
20-45 वयोगटातील 27 पुरुषांच्या वीर्य नमुन्यांचे ‘जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी’ मध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चसाठी संशोधन पथकाने विश्लेषण केले. त्यांच्यापैकी कोणालाही वंध्यत्वाचा पूर्वीचा इतिहास नव्हता. आम्हाला आढळले की कोरोनामुक्त झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि हालचाल लक्षणीयरित्या कमी झाली आहे आणि कोरोना नसलेल्या पुरुषांपेक्षा कमी आकाराचे शुक्राणू असल्याचे डॉ. पारीख यांनी सांगितले.
डॉ श्रीवास्तव यांनी सांगितले की, प्रति रुग्ण 1,000 प्रथिने तपासण्यासाठी आयआयटी बॉम्बेच्या टीमने अका मॅट्रिक्स तयार केला. त्यात आम्ही प्रगत लिक्विड क्रोमॅटोग्राफी-टँडम मास स्पेक्ट्रोमेट्री-आधारित प्रोटीओमिक्स वापरून या प्रथिनांचे विश्लेषण केले. त्यात असे आढळले की, 27 जणांपैकी कोरोनामुक्त झालेल्या 21 पुरुषांमध्ये शुक्राणू कमी झाले होते. वीर्यातील प्रजनन संबंधित प्रथिने, सेमेनोजेलिन 1 आणि प्रोसापोसिन हे त्यांच्या नेहमीच्या पातळीपेक्षा निम्म्या होत्या. डॉ. पारीख पुढे म्हणाले की, पुरुष प्रजनन प्रणालीच्या एकूण कार्य वीर्य प्रतिबिंबित करते. कोरोनाचा पुरुष प्रजनन प्रणालीवर होऊ शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे.
डॉ श्रीवास्तव म्हणाले की, आमच्याकडे या रिसर्चसाठी मर्यादित नमुने होते. दुसरे म्हणजे हा एक प्रारंभिक अभ्यास आहे. या रूग्णांना पुन्हा तपासण्यासाठी आम्ही काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा बोलावणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ शशांक जोशी म्हणाले की, वृषणाच्या पेशींमध्ये ACE2 चे प्रमाण जास्त असल्यामुळे पुरुषांवर कोरोनाचा जास्त परिणाम झाला आहे. कोरोनाने जागतिक स्तरावर स्त्रियांपेक्षा अधिक पुरुषांवर परिणाम झाला आहे. हा एक शैक्षणिक निष्कर्ष आहे आणि एक गृहितक आहे. ज्याचा आपण प्रथम सशक्त क्लिनिकल निष्कर्षांशी संबंध ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.