सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे किंवा तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे म्हणजे आरोग्याचे वरदान हे आपण बरेचदा वाचलेले आहे. परंतु याच पध्दतीने दिवसभरात कधीतरी एक ग्लासभर जिरा पाणी प्राशन केले तर आरोग्याला खूप मदत होते. जिरा पाण्यामुळे शरीरातील पाचकद्रव्ये मोठ्या प्रमाणावर तयार होते आणि पचन क्रियेला गती मिळते. पोटाच्या विकारावर जिरा पाण्याचा उपयोग होतो. पिलेले पाणी शरीराला उपयोगी पडतेच असे नाही. परंतु जिरा पाणी प्राशन केल्याने तेही रात्री झोपताना प्राशन केल्याने दिवसभरात पिलेले पाणी उपयोगी पडायला लागते. जिरा पाण्यात पोटॅशियम असते आणि त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इतरही अनेक द्रव्ये उपयोगी पडतात.
जिरा पाणी पिल्याने अशक्तपणा कमी होतो. कारण जिर्याततील आयर्न म्हणजेच लोह त्यादृष्टीने उपयोगी पडत असते. त्याच्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. जिरा पाण्याने रक्तदाब आटोक्यात राहतो आणि वजन घटण्यास मदत होते. शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करण्याची ताकद जिरा पाण्यात असते. त्याशिवाय जिरा पाणी त्वचेलाही उत्तम असते. त्वचेचे अनेक विकार जिरा पाण्यामुळे दुरूस्त होतात.
जिरा पाणी तयार करण्यासाठी एक लीटर पाणी घ्या आणि त्यात २ चमचे जिरे टाकून चार ते पाच मिनिटे उकळवा. उकळल्याने पाण्याचा रंग बदलतो. हे पाणी काही वेळ थंड होऊ द्या. ते एका बाटलीत साठवून ठेवा आणि दिवसभरात जमेल तसे प्या. जिरा पाणी फार थंड करू नये आणि फार कोमट पाण्यातही पिऊ नये. हे जिरा पाणी तयार करण्यासाठी कच्चे जिरे वापरावेत. भाजलेले जिरे वापरू नयेत. त्यातल्या त्यात पूर्ण जिरा वापरावा. जिरा पावडर वापरू नये. दररोज स्वतंत्र जिरा पाणी तयार करावे. एक दिवस तयार केलेले जिरा पाणी दुसर्यार दिवशी वापरू नये.