ऑनलाइन गेमिंग अॅपबाबत सरकारने कायदा लागू केला. यानंतर भारतात सर्व प्रकारच्या गेमिंग अॅपवर बंदी घालण्यात आलीय. याचा फटका ड्रीम ११ या अॅपलासुद्धा बसला आहे. ड्रीम ११ कंपनी आता भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही अशी माहिती कंपनीकडून बीसीसीआयला देण्यात आलीय.
आता आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाला नवा स्पॉन्सर शोधावा लागेल.
गेमिंग अॅपबाबत नव्या नियमांमुळे ड्रीम ११ला मोठा फटका बसलाय. कंपनीच्या मते नव्या नियमांमुळे आता संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही. बीसीसीआय़ आता लवकरच नवं टेंडर जारी करेल. यामुळे नवा स्पॉन्सर मिळू शकेल. ड्रीम ११च्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे सीईओ हेमंग अमीन यांची भेट घेतली होती. त्यांनीच कंपनी आता भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही असं बीसीसीआय़ला सांगितलं.
आशिया कप स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. अशा स्थितीत बीसीसीआय़ला लवकरच नवा स्पॉन्सर शोधावा लागेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ड्रीम ११ हटल्यानं त्यांच्यावर दंड लागणार नाही. त्यांच्या करारात एक क्लॉज आहे. जर सरकारच्या कोणत्या कायद्यामुळे स्पॉन्सरच्या बिझनेसवर परिणाम झाल्यास करार मोडल्यानं पैसे द्यावे लागणार नाहीत.
ड्रीम ११ कंपनी १८ वर्षांपूर्वी सुरू केली गेली होती. भारतातील सर्वात मोठी फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ही कंपनी उदयास आली होती. कंपनीचे सध्याचे मूल्य ८ बिलियन डॉलर इतकं आहे. जुलै २०२३ मध्ये कंपनीने ३५८ कोटी रुपयांमध्ये बीसीसीआयचे मुख्य स्पॉन्सर म्हणून बोली जिंकली होती. त्याआधी Byju’s स्पॉन्सर होते.