दूध संघाची निवडणूक जरी पुढच्या वर्षी होणार असली तरी कोल्हापुरात त्याचे पडघम मात्र आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकीत दूध संस्थेसाठी ठराव कोणाच्या नावावरून द्यायचं यासाठी आता दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचे चित्र आहे. पन्हाळ्यातील कळेमध्येही असाच प्रकार घडला असून दूध संस्थेतील ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसून आलं.
पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीने देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्यामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार ठराव धारकाला असतो. या ठराव धारकाला मतदानावेळी चांगलाच भाव असतो. त्यामुळे संस्थेचा ठराव नेमकं कोणाच्या नावावर करायचा यावरून दूध संस्थेमध्ये राडा झाला.
पन्हाळ्यात झालेल्या या राड्याची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. शिवाय गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली