गेल्या दोन दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. कच्च्या तेलापासून ते सोन्यापर्यंत सर्वच वस्तू महागल्या आहेत. तसेच पुरवठा साखळी देखील प्रभावित झाली आहे. दरम्यान रशिया, युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा भारतामध्ये वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावित होऊन वाहनाचा निर्मिती खर्च वाढू शकतो. दुसरीकडे देशात आधीच सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यावर आणखी परिणाम हो्ण्याची शक्यता आहे. सेमीकंमडक्टरचा पुरवठा वेळेत न झाल्याने त्याचा परिणाम हा वाहन निर्मितीवर होऊ शकतो. वाहनाची निर्मिती कमी आणि मागणी जास्त वाढल्यास वाहन कंपन्या आपल्या वाहनाची किंमत वाढू शकतात.
रशिया सर्वात मोठा निर्यातदार देश
रशिया आणि पूर्व यूरोपी देशांमध्ये वाहन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सेमी कंडक्टरची मोठ्याप्रमाणा निर्मिती करण्यात येते. रशिया हा सेमी कंडक्टर कंपोडंट निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम हा पुरवठा साखळीवर झाला आहे. पुढील काही दिवस असेच तणावाचे वातावरण राहिल्यास सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणून शकतो. तसेच वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या इतर कच्च्या मालाच्या किमती देखील मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत मागील काही दिवसांत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात वाहनाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालावर सर्वाधिक खर्च
वाहन निर्मितीमध्ये कंपन्यांचा सर्वाधिक खर्च हा वाहनासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यावर होतो. एका युनिट मागे जवळपास सत्तर टक्के खर्च हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी होतो. तर उर्वरीत खर्च हा वाहन निर्मितीवर होतो. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने वाहन कंपन्याला मिळणाऱ्या मार्जिनमध्ये देखील घट झाली आहे. पुढील काळात मार्जिन वाढवण्यासाठी वाहनाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.