भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी किंवा झाडा-पाना-फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं.
कधी या निसर्गातल्या गोष्टींची, शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते तर कधी एखाद्या देवतेच्या पुजेत त्यांचा वापर केला जातो.
दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात.
महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे ‘सोनं’ वाटतात. तर काहीवेळा दसऱ्याला आपट्याच्या पानांच्या आकाराचं सोनं भेट म्हणून दिलं जातं.
पण या प्रथांमागचं कारण काय आहे? आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं, या झाडाचं महत्त्व काय आहे? जाणून घेऊयात.
‘सोनं’ लुटण्याची प्रथा कुठून आली?
हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे.
पुराणकथांनुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती, की ज्या इक्ष्वाकु कुळात त्याचा जन्म झाला, ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
संस्कृतमधल्या महाकवी कालिदासाच्या ‘रघुवंश’ या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश साधारण असा आहे –
कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा, वरतंतु नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतुंनी मला काही नको, असं म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्यामागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला.
त्याचा आग्रह पाहून, काहीशा वैतागलेल्या वरतंतुंनी कौत्साला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतुंना वाटलं. पण कौत्स तसा हुशार.
तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्सानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला.
रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीच संपत्ती गरिबांत वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला.
त्यानं कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौत्साला दान केलं, पण कौत्सानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतुंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला.
कुबेरानंही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता.
या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.
पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही. आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती मानलं आहे.
आपट्याचं झाड महत्त्वाचं का आहे?
आपट्याच्या झाडाचं थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य, म्हणजे त्याची दोन भागांत विभागलेली पानं. कुणाला ती हृदयाच्या आकाराची, बदामाच्या आकाराचीही वाटतात. आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवळसर असतो.
हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिणपूर्व आशियात निमसदाहरीत, पर्णझडी आणि शुष्क जंगलातही आढळतं.
आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हटलं जातं, श्वेत कांचन आणि युग्मपत्र अशा नावानंही हे झाड ओळखलं जातं. हिंदीमध्ये कठमूली, सोनपत्ती तर कोंकणीत आप्टो अशी या झाडाची वेगवेळी नावं आहेत.
या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीयदृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे.
त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं. आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो.
आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जायचा, मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.